बुलढाणा : मोताळा तालुक्यातील पिंपरी गवळी सारख्या लहान गावातून गेल्या वर्षभरात पाच ते सहा मुली बेपत्ता झाल्या आहेत. याच गावातून गेल्या महिन्यात एका १६ वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आले. मुलीचे वडील तक्रार देऊन आले असले तरीही पोलीस प्रशासन कुठलीही ठोस कारवाई करताना दिसून आलेले नाही. या प्रकाराला राज्य सरकारच्या गृह मंत्रालयाचे समर्थन आहे का? असा खडा सवालच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी विचारला आहे.

पिंपरी गवळी येथील बेपत्ता मुलीचे कुटुंबीय आणि गावकऱ्यांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, शिवसेनेच्या नेत्या जयश्री शेळके यांच्यासह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. यावेळी पोलीस अधीक्षकां सह वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले . बुलडाणा जिल्ह्यातून बेपत्ता होणाऱ्या मुलींचे आणि महिलांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. विशेष म्हणजे अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटना देखील अलीकडच्या काळात वाढल्या आहेत. मोताळा तालुक्यातील पिंपरी गवळी या गावात अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले होते.महत्वाचे म्हणजे आरोपीचे नावासकट तशी तक्रार देखील संबंधित पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. मात्र महिना उलटून देखील मुलीचा शोध लागला नाही. त्यामुळे पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी गावकऱ्यांसह आज पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक दिली. जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, जयश्री शेळके या देखील गावकऱ्यांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी आल्या होत्या. यावेळी त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची चर्चा देखील केली. मुलीचा तात्काळ शोध घेण्यात यावा अशा मागणीचे निवेदन यावेळी देण्यात आले.

सरकारने बेपत्ता मुलींची आकडेवारी जाहीर करा यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत म्हणाले की, एकाच गावातून एवढ्या मोठ्या प्रमाणात मुली बेपत्ता होतात मात्र पोलीसांचे धोरण वेळकाढूपणाचे आहे. हा प्रश्न केवळ एका गावापुरता मर्यादित नाही, संपूर्ण तालुक्यात जिल्ह्यात आणि राज्यात किती मुली बेपत्ता झाल्या आहेत, किती अल्पवयीन मुलींचे अपहरण झाले आहे. त्यापैकी किती मुलींचा शोध लागला याची आकडेवारी सरकारने जाहीर करायला पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच गृहखाते आहे, त्यामुळे या सगळ्या प्रकाराला देवेंद्र फडणवीस देखील जबाबदार आहेत. त्यांनी स्वतः या मुलींच्या बेपत्ता प्रकरणात लक्ष घालून पोलीस यंत्रणेला आवश्यक त्या सूचना द्यायला पाहिजेत असे बुधवत म्हणाले. लेकी बाळींची सुरक्षा या राज्यात होते की नाही? असा खडा सवालही बुधवत यांनी केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निवेदन देताना लखन गाडेकर, अनिकेत गवळी, यादव मोहाडे, बबन खरे, श्रीकृष्ण सुरडकर, सुनील इंगळे, नितीन खराटे, शरद खराटे, गजानन पवार डी एन पाटील, गजानन ब-हाट, श्रीकृष्ण वासुदेव पाटील, सुनील भाम्बद्रे, बारसू खराटे, जगन्नाथ पवार, गजू अंबसकर यांच्यासह पिंपरी गवळी येथील गावकरी, माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.