अमरावती : केंद्र सरकारच्‍या ‘७ पीएम-मित्र मेगा टेक्‍सटाईल पार्क’पैकी एक असलेल्‍या अमरावतीतील महा वस्‍त्रोद्योग उद्यानाचा शुभारंभ रविवारी मुंबईत झाला. सुमारे १ हजार २० एकर क्षेत्रात हे महा वस्‍त्रोद्योग उद्यान विकसित करण्‍यात येत असून चार उद्योगांसोबत सामंजस्‍य करारांची देवाण-घेवाण देखील आज करण्‍यात आली.

मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री पियूष गोयल, दर्शना जरदोश, राज्‍यातील मंत्री चंद्रकांत पाटील, उदय सामंत यांच्‍या प्रमुख उपस्थितीत पीएम-मित्र पार्कचा शुभारंभ झाला. या वस्‍त्रोद्योग उद्यानात दहा हजार कोटींच्या गुंतवणुकीसह ३ लाख रोजगारनिर्मिती अपेक्षित आहे. या उद्यानामधून कपड्यांच्या निर्मितीपासून त्यांचे मार्केटिंग, डिझायनिंग आणि निर्यातीपर्यंत सर्व काही एकाच ठिकाणाहून करणे शक्य होणार आहे.

हेही वाचा >>> हाजीर हो! पालिका मुख्याधिकारी महिनाभर गैरहजर, माजी मंत्र्यांनी जिल्हाधिकऱ्यांशी साधला संवाद

भारताच्या कापड व्यवसाय क्षेत्राला चालना देण्‍यासाठी सात राज्‍यांत उभारण्यात येणार असलेली वस्‍त्रोद्योग उद्याने ही पाच ‘एफ’ (फॉर्म टू फायबर टू फॅक्टरी टू फॅशन टू फॉरेन) या संकल्‍पनेवर आधारित आहेत. अमरावती हे ‘ब्राऊन फील्ड’ (अंशतः सुविधांचा महाविस्तार) क्षेत्रात आहे. त्‍यामुळे या ठिकाणी उद्योगांसाठी सर्व सोयी-सुविधा उपलब्‍ध आहेत.  पीएम मित्र उद्यानात इन्‍क्‍युबेशन केंद्र, प्‍लग अँड प्‍ले, उद्योगांसाठी विकसित जागा, वीज, रस्‍ते, पाणी पुरवठा, सांडपाणी व्‍यवस्‍थापन, सीईटीपी यासारख्‍या महत्त्‍वाच्‍या पायाभूत सुविधा राहणार आहेत.

हेही वाचा >>> वाशीम : ऐन पावसाळ्यात नाला खोलीकरण; कामाच्या ठिकाणी माहिती फलकही दिसेना!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमरावतीत गुंतवणुकीसाठी सनातन पॉलिकॉट, पॉलिमन इंडिया, प्रताप इंडस्ट्रिज लिमिटेड आणि सिद्धिविनायक कॉटस्पिन या चार उद्योगांसोबत सामंजस्‍य कराराची देवाण-घेवाण आज करण्‍यात आली. सनातन पॉलिकॉट १ हजार कोटींची, पॉलिमन इंडिया २० कोटी, प्रताप इंडस्ट्रिज २०० कोटी तर सिद्धिविनायक कॉटस्पिन १०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. अमरावतीत नांदगावपेठ येथे ६ हजार ९४० एकर क्षेत्रात औद्योगिक वसाहत आहे. २ हजार ७७७ हजार एकर क्षेत्रात आधीच टेक्‍सटाईल झोन विकसित करण्‍यात आला आहे. पीएम-मित्र पार्कसाठी वीज, पाणी आणि पुनर्प्रक्रिया केंद्राची सुविधा उपलब्‍ध असल्‍याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उद्योग येतील, असा विश्‍वास व्‍यक्‍त करण्‍यात आला आहे.