नागपूर: पंतप्रधान मोदी यांचा आज ७५वा वाढदिवस आहे. भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचाही ७५ वा वाढदिवस झाला. या दोघांचेही अमृतमहोत्सवी वर्ष आहे. सरसंघचालक डॉ. भागवत यांचा काही दिवसांपूर्वी नागपूरमधील एका कार्यक्रमात ७५ वर्ष आणि निवृत्तीवरून एका विधान केले होते. यावरून देशभर चर्चा झाला.

यानंतर डॉ. भागवत यांनी मोदींना निवृत्त होण्याच्या संकेत दिले अशीही चर्चा रंगली होती. मात्र, नुकत्याच झालेल्या दिल्लीच्या विज्ञान भवन येथील कार्यक्रमात यासंदर्भात स्पष्टीकरण दिले होते. त्यानंतर श्री श्री रविशंकर यांच्या नागपूरमध्ये चार दिवसांपूर्व झालेल्या सत्संगमध्ये डॉ. भागवत यांचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शाल आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करतानाही डाॅ. भागवत यांनी वयाच्या ७५ वर्ष पूर्ण होण्यावर एक महत्त्वाचे विधान केले आहे.

जुलै महिन्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक असलेले मोरोपंत पिंगळे यांच्या आयुष्यावरच्या पुस्तकाचे प्रकाशन करत असताना मोहन भागवत यांनी पंचहात्तरीची शाल अंगावर पडली की ती वेळ थांबायची असते असे विधान केले होते. या विधानामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या. पिंगळे यांच्या एका संवादाचा दाखला देताना भागवत यांनी हे विधान केले होते.

भागवत म्हणाले होते, “मोरोपंत पिंगळे एकदा म्हणाले की जेव्हा पंचाहत्तरीची शाल अंगावर पडते त्याचा अर्थ आता थांबावे, तुमचे वय झाले आहे; बाजूला सरा, आम्हाला काम करु द्या” ही आठवण मोहन भागवत यांनी आपल्या भाषणात सांगितली होती. मात्र, याचा संबंध मोदींच्या निवृत्तीशी जोडण्यात आला होता.

भागवत नागपूरमध्ये काय म्हणाले?

११ सप्टेंबरला मोहन भागवत यांचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले. नागपूरमध्ये श्री श्री रविशंकर यांनी त्यांचा सत्कार केला. दरम्यान, मार्गदर्शन करताना भागवत म्हणाले की, अमृत महोत्सव साजरा केला त्याबद्दल ऋणी आहे. मात्र, संघामध्ये व्यक्तीचे वर्धापन दिवस साजरा करण्याला काही महत्त्व नसते. मी काहीही केले नसते तरी माझे पंच्यात्तर वर्ष पूर्ण झाले असते. जर मधात मृत्यू आला नसता तर. त्यासाठी काहीही करावे लागत नाही. ७५ वर्षे जगलो हे माझ्या मते काहीही महत्त्वाचे नाही. आपण कसे जीवन जगलो हे अधिक महत्त्वाचे आहे. आमचे जीवन भगवान शंकरासारखे गेले तर त्याला सर्वाधिक आनंद आहे, असेही भागवत म्हणाले.