वर्धा : एखाद्या कार्यक्रमास ४० ते ५० हजाराची गर्दी लोटत असेल, हजारो वाहने उभी राहणार असेल तर त्याचे नियंत्रण करण्याची तारेवरची कसरत प्रशासनास करावी लागणारच. लहान खेडेवजा शहरातील नागरिक मग विविध अटी पाळत हजेरी लावतोच. पण अशा ठिकाणी गाडी लावण्यास भरभक्कम शुल्क घेतल्या जात असेल तर तो जाणेच टाळणार.

सिंदी रेल्वे येथील तान्हा पोळा हा उभ्या विदर्भात प्रसिद्ध. नागपूरची मारबत आणि सिंदीचा तान्हा पोळा हे दोनच पारंपरिक सण अद्याप आकर्षण राखून असलेले गर्दीचे उत्सव असल्याचे म्हटल्या जाते. या ठिकाणी जिल्ह्यातूनच नव्हे तर विदर्भातील अनेक जिल्ह्यातून पोळाप्रेमी हजेरी लावतात. मोठ्ठी गर्दी उसळते. वाहनांची रिघ लागते. त्याचे नियोजन करण्याची जबाबदारी सिंदी नगर पालिकेवर असते. पालिकेने अफाट संख्येत वाहने येत असल्याने गोंधळ उडू नये म्हणून पार्किंग जागा तयार केली. मात्र त्यासाठी दुचाकीस ३० रुपये व चार चाकी गाडीस ४० रुपये असे शुल्क ठेवले. त्यामुळे पार्किंगवर खर्च करायचा की मुलांच्या भातक्यावर, म्हणजे खेळणीवर असा प्रश्न उपस्थित केल्या जात असून संताप व्यक्त होत आहे.

कामगार नेते नरेश पेटकर यांनी हे शुल्क पाहून समाज माध्यमावर संताप व्यक्त केला. छापलेली पावती दाखवत ते म्हणतात हे अवाजवी शुल्क आहेच पण सुविधा काहीच नाही. दीड किलोमीटर अंतरावर वाहने ठेवून मुलाबाळासह पायी यावे लागते. पाऊस आला की गाड्या फसतात. रात्री १२ वाजतात तरी गाड्या काढता येत नाही. दरवर्षी तक्रारी केल्या जातात. पण काहीच होत नाही. आमदार समीर कुणावार यांना यावर्षी अवगत केले. पण त्यांचे पण ऐकल्या जात नसल्याचे दिसून आल्याचे पेटकर नमूद करतात. पालिका प्रशासन या आयोजनाचे नियोजन करण्यास जबाबदार असते. त्यांच्याशी संपर्क होवू शकला नाही.

मात्र आमदार समीर कुणावार यांनी स्पष्ट केले की लोकांची गैरसोय होईल असा कुठलाच गैरप्रकार खपवून घेतल्या जाणार नाही. पार्किंग शुल्कबाबत पालिका प्रशासनाशी बोलणे झाले. ते आता १० रुपये व २० रुपये असे शुल्क आकारणार. जुनी पावती आता खोटी ठरणार. मी स्पष्ट केले की वाढीव दराने सुविधा नको. गरज पडल्यास मी पैसे जमवून देईल, अशी भूमिका आमदार कुणावार यांनी मांडली.

सिंदी रेल्वे येथील पोळ्यास १४२ वर्षांची परंपरा आहे. बाल गोपालांचा हा मेळा असतो. अफाट गर्दी होत असल्याने या गावास पोळा सिटी अशी ओळख मिळाली आहे. म्हणून बाजार चौकात नंदीचा पुतळा बसविण्यात आला. यावर्षी २३ ऑगस्टला तान्हा पोळा असून त्याची जय्यत तयारी सूरू झाली आहे. महावितरण, पोलीस व अन्य प्रशासकीय यंत्रणा उपस्थित असून तयारीचा आढावा घेत आहे. कारण गावातील प्रत्येक घरी पाहुणा आलेला असतो. झाडून सर्व नेते हजेरी लावतात.

विविध कला, रोषणाई, बँड पथक, नृत्य व अन्य मनोरंजनपर कार्यक्रम होतात. मानाचे नंदी म्हणून संजय जायस्वाल यांचा पाच फुटी नंदी, नागपूरचे विकास पेटकर यांचा साडे पाच फुटी लाल नंदी, १९४२ साली घडविलेला पिंपळवार यांचा कोरीव नंदी, १९५३ चा परखड यांचा नंदी, १९६६ साली घडलेला राठोड यांचा एका सलग लाकडातून बनलेला नंदी व अन्य मान राखून असतात. तसेच सिंदीचे चंद्रशेखर अवचट यांचा दरवर्षी वेगळी आकर्षक सजावट असणारा नंदी लक्ष वेधून घेत असतो.