गडचिरोली : नक्षल्यांच्या हिंसक कारवायांवर अंकुश ठेवत धाडसाने चोख प्रत्युत्तर देणाऱ्या गडचिरोली पोलीस दलातील १८ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना शौर्य तर एका अधिकाऱ्यास राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशाच्या गृहमंत्रालयाने जाहीर केलेल्या यादीत जिल्ह्यातील १९ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्थान मिळवल्याने ही अभिमानाची बाब मानली जात आहे.
पोलीस दलात उत्कृष्ट, धाडसी व गुणवत्तापूर्ण सेवा देणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पदक देऊन गौरविले जाते. प्रजासत्ताकदिनापूर्वी हे पदक घोषित केले जातात. त्यानुसार २५ जानेवारीला केंद्रीय मंत्रालयाने ही यादी जाहीर केली. जिल्ह्यात सेवा बजावलेले तत्कालीन अपर अधीक्षक सोमय मुंडे, उपअधीक्षक संकेत गोसावी यांच्यासह पोलीस नाईक कमलेश नैताम, शंकर बाचलवार, मुन्शी मडावी, देवेंद्र आत्राम, संजय वचामी, विनोद मडावी, गुरुदेव मेश्राम, माधव मडावी, जीवन नरोटे, हवालदार मोहन उसेंडी, कॉन्स्टेबल हिराजी नेवारे, ज्योतिराम वेलादी, सूरज चुधरी, विजय वडेट्टवार, कैलास गेडाम यांना शौर्य पदक जाहीर झाले असून सहायक उपनिरीक्षक देवाजी कोवासे यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. प्रजासत्ताकदिनी या सर्वांचा मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमात गौरव केला जाणार असून राष्ट्रपतींच्या हस्तेही लवकरच सन्मान केला जाणार आहे.
हेही वाचा – खुशखबर! सोन्याच्या दरात मोठी घसरण, असे आहेत आजचे दर…
हेही वाचा – ऊर्जामंत्र्यांच्या शहरात महावितरणच्या दोन बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांची एकाला मारहाण…
गौरवशाली परंपरा कायम
गेल्या वर्षी जिल्हा पोलीस दलातील ६२ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पदक जाहीर झाले होते. यंदाही गडचिरोली पोलीस दलाने गौरवशाली परंपरा कायम ठेवत पदकांमध्ये दबदबा राखला. पदकप्राप्त पोलीस अधिकारी व अंमलदारांचे उपमहानिरीक्षक संदीप पाटील, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर अधीक्षक यतीश देशमुख, बी. रमेश व कुमार चिंता यांनी स्वागत केले आहे.