गडचिरोली : गडचिरोली-नारायणपूर सीमेवरील कोपर्शी जंगल परिसरात आज सकाळी पोलीस व नक्षलींमध्ये झालेल्या चकमकीत चार जहाल नक्षलवादी ठार झाले. त्यामध्ये एक पुरुष व तीन महिलांचा समावेश आहे.

घटनास्थळावरून ‘एसएलआर’ रायफल, दोन इन्सास रायफल व एक ३०३ रायफल पोलिसांनी जप्त केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या परिसरात दोन दिवसापासून केंद्रीय समिती सदस्य सोनू उर्फ भूपती आणि कोसा हे दोघे सदस्यांसह ठाण मांडून बसले होते.

२५ आगस्ट रोजी छत्तीसगड सीमेवरील कोपर्शी घनदाट जंगल परिसरात गट्टा दलम, कंपनी क्रमांक १० व इतर नक्षलवादी बैठकीसाठी एकत्र आले होते. यात काही मोठ्या नेत्यांचा देखील समावेश होता. गडचिरोली पोलीस अधीक्षक निलोत्पल यांना ही गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी अपर अधीक्षक एम.रमेश यांच्या नेतृत्वात सी-६० च्या १९ आणि ‘सीआरपीएफ’च्या तुकड्या नक्षलविरोधी अभियानासाठी रवाना केल्या. कोपर्शी परिसरात मागील दोन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरु असल्याने त्यापरिसरात पोहोचण्यासाठी पोलीस जवानांना दोन दिवस अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागला.

दरम्यान, २७ आगस्ट रोजी पहाटे ५ वाजताच्या सुमारास जंगलात दबा धरून बसलेला नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने जोरदार गोळीबार सुरू केला. यावेळी जवानांनी देखील चोख प्रत्युत्तर दिले. ही चकमक आठ तास चालली. चकमकीनंतर परिसरात पोलिसांनी शोध घेतला असता चार नक्षलवाद्यांचे मृतदेह, शस्त्रसाठा व नक्षल साहित्य आढळून आले. यात तीन महिला व एक पुरुषाचा समावेश आहे. चकमक परिसर घनदाट जंगलाने वेढलेला असल्याने अजूनही काही नक्षलवादी लपून बसल्याची शक्यता आहे. त्यामुळे नक्षल विरोधी मोहीम अद्यापही सुरूच असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

केंद्रीय समिती सदस्यांची उपस्थिती ?

गेल्या चार वर्षापासून गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या हालचाली मर्यादित झाल्या आहे. चकमकीत अनेक नेते, सदस्य मारल्या गेल्याने आणि नवीन भरती बंद असल्याने जिल्ह्यात चळवळ कमकुवत झाली आहे. शेजारच्या छत्तीसगडमध्येही नक्षलविरोधी मोहीम तीव्र केल्याने नक्षलवाद्यांची कोंडी झाली आहे. यावर चर्चा करण्यासाठी कोपर्शीच्या जंगलात नक्षल चळवळीचा प्रभारी नेता तथा केंद्रीय समिती सदस्य भूपती आणि केदारी रेड्डी उर्फ कोसा त्याठिकाणी आले होती. अशी शक्यता आहे. या कारवाईनंतर नक्षलवाद्यांना मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.