नागपूर : अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा पुण्यातील पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांच्या सुनेच्या आत्महत्या प्रकरणाने राजकीय पुढाऱ्यांची हुंड्याविषयी मानसिकता समोर आली. नागपुरातील एका राजकीय कुटुंबातील एका सुनेने छळाची तक्रार दिल्यानंतर भाजपच्या आमदाराच्या कुटुंबाविरुद्ध अंबाझरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांच्या सुनेच्या आत्महत्या प्रकरणात पत्नी, मुलगा आणि मुलगी यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर राजेंद्र हगवणे आणि त्यांचा दुसरा मुलगा फरार आहे. वैष्णवी हवगणे यांनी १६ मे रोजी आत्महत्या केली होती.वैष्णवी यांचे वडील आनंद कस्पटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वैष्णवीचा पती, सासू-सासरे, नणंद आणि दीर यांनी हुंड्यासाठी मानसिक, शारीरिक छळ करून क्रूर वागणूक दिली. मारहाण व जाच करून तिच्या मृत्यूस ते कारणीभूत ठरले आहेत.
या प्रकरणी पोलिसांनी वैष्णवी हगवणे याचे पती, सासू आणि नणंद यांना अटक केली आहे. पुण्यात वरील प्रकरणाने खळबळ उडाली असताना नागपुरात भाजपचे आमदार परिणय फुके यांच्या कुटुंबातील प्रकरण चव्हाट्यावर आले आहे. फुके यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांवर अंबाझरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फुके यांचे दिवंगत भाऊ संकेत यांची पत्नी प्रिया फुके यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार संकेत फुके किडनीच्या आजाराने त्रस्त होते. ही बाब लग्नाच्या वेळी लपवून ठेवण्यात आली.
आमचे कुटुंब सधन असून राजकीय दबावाने काहीही करू शकतो. तू शांत राहिली नाहीस तर तुझ्या आई आणि बहिणीवर अत्याचार करवू, अशी धमकी सासऱ्यांनी दिली. संकेत यांचा मृत्यू सप्टेंबर २०२२ ला झाला होता. त्यानंतर एटीएम कार्ड, बँक पास बुक, दागिणे बळजबरीने काढून घेतले. अताशा आशीर्वाद बिल्डर्समधील ४० टक्के शेअरर्स परस्पर सासू-सासऱ्याच्या नावाने करवून घेतले, अशी तक्रार प्रिया फुके यांची आहे.
याप्रकरणात आमदार फुके यांच्यासह रमेश गोविंदराव फुके (७२), आई रमा फुके (६७), पत्नी परिणिता फुके (४१) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, आमदार फुके यांची आई रमा फुके यांनी ११ मे रोजी २०२५ रोजी अंबाझरी पोलिसात धाव घेतली आणि नातवंडांना भेटण्यासाठी सुन प्रिया पैशाची मागणी करीत आहे. तसेच समाजमाध्यमांवर बदनाम करण्याची धमकी दिल्याची तक्रार केली.