नागपुरातील एका पोलीस उपनिरीक्षकाने १६ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला. या प्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी आरोपीला अटक केली. प्रदीपकुमार श्रीकृष्ण नितवणे (३५, फ्रेंड्स कॉलनी, गिट्टीखदान) असे पीएसआयचे नाव आहे. या घटनेमुळे पोलिसांच्या प्रतिमेला तडा गेला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीपकुमार नितवणे हा २०१६ मध्ये पोलीस दलात रुजू झाला. सध्या तो नागपुरातील डीआयजी गडचिरोली परिक्षेत्र कार्यालयात कार्यरत आहे. पीडित १६ वर्षीय मुलगी रिया (काल्पनिक नाव) मूळची सावनेरची असून सध्या नागपुरात बारावीचे शिक्षण घेत आहे. प्रदीप आणि रियाच्या वडिलाची मैत्री आहे. रिया शिक्षणासाठी सीताबर्डी भागात राहते. तिच्याकडे लक्ष ठेवण्यास तिच्या वडिलाने प्रदीपला सांगितले होते. दरम्यान, तो रियावर एकतर्फी प्रेम करू लागला. तो वारंवार तिला भेटत होता तसेच फोन करीत होता. त्याने रियाला पावसात धबधबा बघायला कुटुंबासह जात असल्याचे सांगितले व सोबत चलण्याचा आग्रह केला. सायंकाळपर्यंत परत येणार असल्यामुळे तिने होकार दिला.
बुधवारी सकाळी १० वाजता तो तिच्या खोलीवर गेला. दोघेही कारने धबधबा बघायला निघाले. त्याने तिला चिखलदरा येथे एका लॉजमध्ये नेले. शीतपेयात गुंगीचे औषध टाकून व बळजबरीने दारू पाजली व तिच्यावर रात्रभर बलात्कार केला. आईवडिलांना सांगितल्यास तिला आत्महत्या करण्याची धमकी दिली. दरम्यान नागपुरात येताच रियाने आईवडिलांना फोन करून सर्व माहिती दिली. तिच्या आईवडिलांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्रदीप नितवणेला अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. प्रदीप विवाहित असून त्याला पत्नी व दोन मुली आहेत.