देवेंद्र गावंडे

राजकारणात प्रमुख नेत्यांचा जो खास माणूस असतो त्याला कायम टीका व असूयेला सामोरे जावे लागते. बरेचदा हे पक्षाच्या आतून व बाहेरून सुद्धा घडत असते. प्रामुख्याने पक्षात वावरणारे इतर नेते प्रमुखाला तर आव्हान देऊ शकत नाही. मग अशावेळी या खास माणसाला लक्ष्य केले जाते. अमरावती पदवीधरमध्ये पराभूत झालेल्या रणजीत पाटलांच्या बाबतीत नेमके हेच घडले. ते फडणवीसांचे खास म्हणून ओळखले जातात. त्यांच्या मागच्या कार्यकाळात अनेक महत्त्वाची खाती त्यांच्याकडे होती. आताही विस्तार झाला तर त्यांचे मंत्रीपद पक्के होते. नेमकी हीच बाब त्यांच्या पराभवाला कारणीभूत ठरली. वऱ्हाडातल्या भाजपच्या झाडून साऱ्या नेत्यांनी त्यांच्या पराभवात हातभार लावला. एकदा ते आमदार पदावरून पायउतार झाले की फडणवीस इतरांचा विचार करतील हा शुद्ध स्वार्थी हेतू यामागे होता. असे खास म्हणून मिरवणाऱ्यांचे पक्षातील इतरांशी कधीच पटत नाही. हा राजकारणातला सार्वत्रिक अनुभव. पाटलांचेही तसेच होते. ते एकटे व बाकी सारे एकत्र. त्यामुळे मतदारसंघावर बऱ्यापैकी पकड असूनही फडणवीसांची पंचाईत करून ठेवली ती त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांनी. पाटलांच्या नावासमोर दोन हा आकडा टाकून मुद्दाम अवैध केलेली नऊ हजार मते हेच दर्शवतात. अर्थात या पतनामागे हे प्रमुख कारण असले तरी अन्यही कारणे आहेतच. पाटील कमालीचे निष्क्रिय होते. अशा मतदारसंघात सक्रिय राहण्यासाठी काय करावे लागते हे त्यांना शेवटपर्यंत उमगलेच नाही.

sanjay raut modi mohan bhagvwat
“RSS नरेंद्र मोदींना सत्तेतून…”, संघातील नेत्यांच्या ‘त्या’ वक्तव्यांचा दाखला देत राऊतांचं मोठं वक्तव्य
Rise of Jana Sena Party in Andhra Pradesh politics Pawan Kalyan vsh
आमदारकीला पराभूत ते आता थेट उपमुख्यमंत्री! अभिनेता पवन कल्याण यांनी कसा उभारला नवा पक्ष?
Rajabhau Waje, Nashik,
ओळख नवीन खासदारांची : राजाभाऊ वाजे (नाशिक, शिवसेना ठाकरे गट); साधेपणा हाच चेहरा
लोहिया ते अखिलेश व्हाया मुलायम! उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी राजकारणाचा प्रवास कसा झालाय?
wardha lok sabha seat, Unsung Heroes Who Contributed to Amar Kale s Victory, amar kale victory, ncp sharad pawar, maha vikas aghadi, amar kale,
वर्धा : अमर काळे यांच्या विजयाचे पडद्यामागील ‘हे’ आहेत सूत्रधार
Hindutva
हिंदी पट्ट्यातले ‘हिंदुत्व’ भाजपला यंदाही तारेल?
BJP, BJP s path tough in Haryana, displeasure of farmers , six phase of lok sabha 2024, BJP s path tough in Punjab, displeasure of farmers against bjp, marathi news lok sabha 2024,
हरयाणा, पंजाबमध्ये बहुरंगी लढतींमुळे भाजपचा मार्ग खडतर? सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांच्या नाराजीची चिंता?
Arvind Kejriwal interview Prime Minister Modi Amit Shah BJP aam aadmi party
पंचहात्तरीनंतर निवृत्त होण्याचा स्वत:चाच नियम मोदी का पाळणार नाहीत? केजरीवाल म्हणाले…

नागपूर शिक्षकमध्ये गाणारांचा पराभव हा केवळ गडकरीच नाही पण एकूण भाजपनेत्यांच्या वर्मी बसलेला घाव आहे. गाणार तसे सज्जन. सध्या आक्रमक असलेल्या भाजपला न मानवणारे. सलग दोन विजयानंतर त्यांना उमेदवारीच द्यायला नको होती. पक्षातही इतर नावांवर विचार सुरू होता पण काही वर्षांपूर्वी पदवीधरमध्ये सोलेंऐवजी संदीप जोशी हा प्रयोग अयशस्वी ठरल्याने फडणवीस, बावनकुळेंनी फार ताणले नाही व गडकरींच्या गोटातल्या गाणारांना पुन्हा संधी मिळाली. त्यामुळे या जागेवर डोळा ठेवून असलेल्या अनेकांचा हिरमोड झाला. त्यात शिक्षण मंच आघाडीवर होता. परिणामी, गाणारांचा प्रचारच नीट उभा राहून शकला नाही. आता गाणार म्हणतात, फडणवीसांनी जुन्या निवृत्ती वेतनाबाबत केलेले विधान भोवले. हे अर्धसत्य. प्रचाराच्या काळात गडकरी सुद्धा त्यांच्या नेहमीच्या कान टोचण्याच्या स्वभावानुसार शिक्षकांविषयी नको ते बोलले. प्रचाराच्या काळात हे कोण ऐकून घेईल? त्याचा फटका विदर्भात सर्वाधिक मजबुतीचा दावा करणाऱ्या भाजपला बसला. विदर्भातील या दोन्ही पराभवाने भाजपला आत्मचिंतनासाठी भाग पाडले हे नक्की. अजूनही देशात मोदींचीच हवा आहे, त्यामुळे आपण काहीही केले किंवा नाही केले तरी खपून जाते या भ्रमात हा पक्ष कायम वावरत असतो. चिंतन वगैरे तर दूरची गोष्ट. त्यातल्या त्यात राज्यात परत सत्ता मिळाल्याने सारेच नेते उन्मादी अवस्थेत पोहचलेले. या निकालाने या साऱ्यांना जमिनीवर आणले.

अपवाद फक्त बावनकुळेंचा. एवढे होऊनही हे तडफदार प्रदेशाध्यक्ष गाणार आमचे उमेदवारच नव्हते. त्यांनी परिषदेऐवजी पक्षाची उमेदवारी स्वीकारली असती तर चित्र वेगळे असते. हे त्यांचे विधान फाजील आत्मविश्वासाचे उत्तम निदर्शक. गाणार हरताच ते आमचे नव्हतेच असे म्हणणे म्हणजे जबाबदारी नाकारण्यासारखेच. बावनकुळेंचे हे म्हणणे खरे मानले तर ते, फडणवीस व गडकरी पक्षाला विजयी करा असे प्रचारात का सांगत होते? गाणार विजयी व्हावे म्हणून या क्षेत्राशी दुरान्वयाने संबंध नसलेल्या आमदार मोहन मतेंची प्रचारप्रमुख म्हणून नेमणूक का केली गेली? समजा गाणारांनी भाजपचे चिन्ह स्वीकारले असते तर मताधिक्यातले मोठे अंतर सहज भरून निघाले असते असा दावा बावनकुळे कोणत्या आधारावर करतात? वस्तुस्थिती अशी की प्रचारसभा सोडल्या तर भाजपमधील कुणीही गाणारांसाठी मनापासून झटले नाही. आता सत्ता मिळाली त्यामुळे वैदर्भीय खूश आहेत. तेव्हा पराभवाचा प्रश्नच नाही या भ्रमात सारे राहिले. गडकरी कोणतीही निवडणूक गांभीर्याने घेतात. तसेही चित्र दिसले नाही. पदवीधर, शिक्षक हे प्रामुख्याने शिक्षित व मध्यमवर्गीय मतदारांचे संघ अलीकडच्या काळात भाजपचे बालेकिल्ले झालेले. मोदीच देशाला तारून नेणार यावर ठाम विश्वास असलेला हा वर्ग. तोच हातचा निसटू लागला आहे हे या निकालातून स्पष्टपणे दिसले. एरवी हा वर्ग जनमानसात मोदींविषयी सकारात्मक भावना निर्माण करण्यात नेहमी पुढाकार घेत आलेला. तोच भाजपला नाकारू लागला ही या पक्षासाठी धोक्याची नांदी.

आमचा पक्ष शिस्तीत चालणारा आहे. कोणत्याही निवडणुकीसाठी तो प्रत्येकवेळी ‘ॲक्शन मोड’वर असतो. आम्ही प्रत्येक निवडणूक गांभीर्याने लढतो. ती लढण्यासाठी प्रचार ते पन्नाप्रमुखापर्यंतची भलीमोठी यंत्रणा आमच्याकडे कायम सज्ज असते. या साऱ्यांवर थेट पक्षमुख्यालयातून नियंत्रण ठेवले जाते. उमेदवार कुणीही असो ही यंत्रणा त्यांचे काम निष्ठेने करत असते. अंतर्गत कुरबुरी, गटबाजीला आमच्या पक्षात अजिबात स्थान नाही. प्रत्येकजण एकदिलाने काम करतो असे अनेक दावे भाजपकडून सातत्याने केले जातात. अनेकदा या दाव्यात तथ्य असल्याचे दिसूनही येते. नेते कायम मेहनत घेताना दिसतात पण मतदारांनी एकदा का धक्का द्यायचे ठरवले तर कितीही सुसज्ज असलेल्या पक्षाचे काहीएक चालत नाही. भंडारा पोटनिवडणूक, नंतर नागपूर पदवीधर व आता दोन्ही ठिकाणी हे दिसून आले. यापासून बोध घ्यायचा असेल तर गडकरी, फडणवीस व बावनकुळेंना त्यांचे सल्लागार बदलावे लागतील. वास्तव काय याचा विचार करावा लागेल. कायम अहंगंडात वावरणे सोडावे लागेल. कायम जेता कुणीही नसतो. निवडणुकीच्या राजकारणात तर नाहीच नाही याचे भान ठेवावे लागेल.

यातला शेवटचा मुद्दा आहे तो जुन्या निवृत्ती वेतनाचा. हिवाळी अधिवेशनात फडणवीसांनी यावर केलेले भाष्य अगदी योग्य होते. ही योजना आर्थिकदृष्ट्या अजिबात परवडणारी नाही. ज्यांनी २००५ नंतर नोकरी स्वीकारली त्यांनी ही योजना नाही हे गृहीत धरलेच होते. तरीही आता हा मुद्दा शिक्षक कळीचा करताहेत. त्याला एकमेव कारण आहे ते विजय मिळवण्यासाठी काँग्रेसने या मुद्याचे केलेले राजकीयीकरण. असे मुद्दे प्रगतीसमोर अडसर ठरू शकतात. तरीही काँग्रेसने यावरून राजकारण तापवले. परिणामी, अर्थमंत्री म्हणून ठाम भूमिका घेणाऱ्या फडणवीसांना सुद्धा आता या मुद्याच्या मागे फरफटत जावे लागणार असे दिसते. हे वाईट आहे. अर्थकारणाचे भान नसलेले राजकारण राज्याला गाळात नेऊ शकते. मात्र असा विचार करण्याच्या भानगडीत आजकाल कुणी पडत नाही. तूर्तास तरी भाजपला त्यांचा गड म्हणवणाऱ्या विदर्भाने झटका दिला एवढेच महत्त्वाचे!