लोकसत्ता टीम

गोंदिया : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. सर्व पक्षांकडून जिंकूण येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वातील महायुती विरुद्ध काँग्रेस, शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीत थेट लढत होईल, असे जवळपास स्पष्ट झाले असले तरी काही जागांवरून महायुती आणि महाविकास आघाडीत अद्यापही काथ्याकूट सुरू आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शकले झाल्यामुळे अनेक मतदारसंघांतील राजकीय समीकरणे बदलली आहेत. तत्कालीन एकसंघ पक्ष आता दोन गटांत विभागल्याने इच्छुकांचीही संख्या वाढली आहे. काही मतदारसंघांत महायुती-महाविकास आघाडीतील मित्रपक्षांतही रस्सीखेच सुरू आहे. अशातच, गोंदिया विधानसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीत तिढा निर्माण होण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. कारण, या मतदारसंघावर महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष काँग्रेस आणि शिवसेना उबाठानेही दावा केला आहे. दोन्ही पक्ष या जागेसाठी आग्रही असल्याचे दिसते आहे.

आणखी वाचा-हृदयद्रावक! स्कूल व्हॅनने विद्यार्थ्याला चिरडले; घटनास्थळीच सोडला जीव

काय म्हणाले होते काँग्रेस नेते?

गोंदियातील माजी आमदार गोपालदास अग्रवाल पंधरा दिवसांपूर्वी भाजपाला रामराम ठोकून काँग्रेसमध्ये परतले. त्यांच्या काँग्रेस पक्षप्रवेशाचा भव्य सोहळा गोंदियात पार पडला. या सोहळ्यात काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री सुनील केदार, माजी मंत्री नितिन राऊत व इतर नेत्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत गोपालदास अग्रवाल हेच येथील उमेदवार राहतील, असे सांगितले. हा मतदारसंघ काँग्रेसकडेच राहील, ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असा दावाही या नेत्यांनी केला होता. यामुळे हा मतदारसंघ काँग्रेसकडेच राहील, असे बोलले जात होते. यामुळेच की काय, गोपालदास अग्रवाल यांनी गोंदिया विधानसभा मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरू केली.

शिवसेना ठाकरे गटाचाही दावा

अशातच, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पूर्व विदर्भ संपर्कप्रमुख आमदार भास्कर जाधव यांनी पूर्व विदर्भाचा दौरा केला. नागपूर येथील बैठकीत त्यांनी गोंदिया विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार रमेश कुथे हे उमेदवार असतील, असे संकेत दिले. हा मतदारसंघ आपल्याकडेच राहील. त्यामुळे कामाला लागा, असा शब्द त्यांनी कुथे यांना दिला.

आणखी वाचा-नागपूर : तंत्रस्नेही महिला अधिकाऱ्याच्या उपक्रमाला राज्यभर पसंती अन्…

उमेदवारीसाठीच भाजपाला रामराम

गोंदिया येथील माजी आमदार रमेश कुथे यांनी दोन महिन्यांपूर्वी भाजपाला रामराम ठोकून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला होता. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कुथे यांना गोंदिया विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याचे आश्वासन दिले होते. यामुळेच ते ठाकरे गटात परतले. उद्धव ठाकरेंचे आश्वासन आणि भास्कर जाधव यांच्या शब्दावरून कुथे यांनीही या मतदारसंघातून निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माघार घेणार कोण?

काँग्रेस आणि ठाकरे गटाने परस्पररित्या आपापल्या नेत्यांना उमेदवारीचे आश्वासन देऊन टाकले. मात्र, हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला जाणार की ठाकरे गटाच्या? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. गोपालदास अग्रवाल आणि रमेश कुथे हे दोन्ही नेते तयारीला लाहेत. तूर्तास, महाविकास आघाडीत हा मतदारसंघ नेमका कुणाकडे? दोघांपैकी कोणाला माघार घ्यावी लागणार? असे अनेक प्रश्न गोंदिया मतदारसंघात चर्चिले जात आहे.