अकोला : राज्यात पावसाने थैमान घातले असतांना शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अद्यापही शासनाने ओला दुष्काळ जाहीर केलेला नाही. महाराष्ट्रात चोरांचे सरकार आहे. निविदा प्रक्रियेतून मिळणारा मलिदा कमी होऊ नये म्हणून ओला दुष्काळ जाहीर करण्यात सत्ताधारी टाळाटाळ करीत आहेत, असा घणाघाती आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज येथे केला.
अकोल्यात माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी सत्ताधारी व विरोधकांवर टीकेचे बाण सोडले. राज्यात सर्वत्र पावसाने कहर केला. शेतीतील पिके उद्ध्वस्त झाली आहेत. काही ठिकाणी पिके हिरवीगार दिसत असले तरी त्याठिकाणचेही उत्पादन घटू शकते. शेतांमध्ये अक्षरश: पोहण्यासारखे पाणी जमा झाले. तरीही शासनाने अद्याप ओला दुष्काळ जाहीर केलेला नाही. महाराष्ट्रात चोरांचे शासन आहे. ओला दुष्काळ म्हटल्यावर सर्वप्रथम खावटी जाहीर करावी लागते. खावटीचे वाटप होऊ नये, आपल्याला निविदेच्यामार्फत मिळणारे पैसे कमी होऊ नये म्हणून ओला दुष्काळ देखील जाहीर केला जात नसल्याची टीका ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. राज्य शासनाच्या या धोरणाचा त्यांनी निषेध केला.
सत्ताधाऱ्यांकडून दिवाळीच्या अगोदर नुकसान भरपाई देणार असल्याचे सांगितले जाते. नुकसान भरपाई देण्यासाठी दुष्काळ जाहीर करावा लागतो. एकदा पाऊस ओसरला की दुष्काळ जाहीर करता येणार नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत दुष्काळ जाहीर का केला नाही? असा प्रश्न निर्माण होतो. शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्याची मागणी दुर्दैवाने इतर पक्षांच्या नेत्यांकडून केली जाते. पहिल्यांदा त्यांनी स्वत:चे चारित्र्य तपासून बघावे. ते मुख्यमंत्री राहिले आहेत, सत्तेत होते. त्यावेळी सातबारा कोरा का केला नाही? याचे अगोदर उत्तर द्यावे. शेतकऱ्यांची कर्जमाफी केली असती तर त्यांचा निविदा प्रक्रियेतील लाभ कमी झाला असता, अशी टीका त्यांनी विरोधकांवर केली.
मतदार स्वत:शी प्रामाणिक नाही
मतदार हा स्वत:शी प्रामाणिक नाही. ते जर स्वत:शीच प्रामाणिक नसतील तर त्यांना न्याय कसा मिळणार? मतदार जात आणि धर्म पाहून मतदान करतात. आता तरी त्यांनी शहाणे व्हावे. ज्यांनी आपले प्रश्न, परिस्थितीकडे दुर्लक्ष केले, त्या नेत्यांना कायमचे दुर्लक्षित करावे, असे आवाहन ॲड. आंबेडकरांनी केले.
भाजप वगळता इतर पक्षांशी युतीची तयारी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप वगळता इतर पक्षांसोबत वंचित आघाडी युती करण्यासाठी तयार आहे. त्याचे अधिकार स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिले. काँग्रेसला आमच्यासोबत नेमके काय वाकडे आहे? हे सांगावे, असे देखील ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले.