अकोला : जागतिक पातळीवरील विविध देशांचे नेते भारतीय पंतप्रधानांच्या विश्वगुरू भूमिकेच्या विरोधात आहेत. ते विश्वगुरू आहेत की चपराशी? हे दाखवण्यासाठीच विविध देशातून भारतीयांची हकालपट्टी सुरू झाली. जागतिक स्तरावर आपला एकही मित्र नाही. त्याचे एकमेव कारण विश्वगुरू. त्यांचा अहंकार जपण्यासाठी ते देशाचा बळी देत आहेत, असा घणाघाती आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे केला.
भारतीय बौद्ध महासभाच्यावतीने आयोजित धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सवातील धम्म मेळावा जाहीर सभेत ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पी. जी. वानखडे होते. यावेळी वंचितच्या नेत्या प्रा. अंजली आंबेडकर, सुजात आंबेडकर, प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, माजी आमदार नातिकोद्दिन खतिब, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, जि.प.चे माजी अध्यक्ष बालमुकुंद भिरड, राजेंद्र पातोडे, नीलेश देव आदींसह पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य करतांना केंद्र व राज्य सरकार, स्वयंसेवक संघावर चाैफेर टीका केली. विश्वगुरू जागतिक व्यासपीठावर गेल्यावर इतर नेते त्यांना बाजूला सारतात. विश्वगुरु डोनॉल्ड ट्रम्पला मित्र मानतात. मात्र, परिस्थिती विपरीत आहे. जगातील बहुतांश देश पाकिस्तानच्या बाजुने उभे राहिले. अमेरिका, इराण, रशिया आदी देश शस्त्र पुरवतात. जागतिक पातळीवर बहुतांश देश त्यांच्या बाजूने उभे राहिल्यास आपले काय होणार याचा विचारला केला पाहिजे. पाकिस्तानला शस्त्र पुरवून भारताला गुलाम करण्याचे षडयंत्र आखले जात आहे, असे ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले.
आरक्षणाचा फायदे ओबीसींना पाहिजे. त्यांच्यासाठी वंचितने लढा दिला. मात्र, आता ते वंचितला स्वीकारण्यास तयार नाही. त्यांनी भाजप, स्वयंसेवक संघावर विश्वास ठेवला, त्यांनीच ओबीसींचा घात केला. हे ओबीसींनी समजून घेतले पाहिजे, तरच आरक्षण वाचेल. राजकीय आरक्षणासोबतच शैक्षणिक आरक्षण देखील जाईल. समाज व्यवस्थेत ज्या शिडीने वर गेलो, त्याचा आदर करण्याची गरज आहे. स्वत:ची लढाई स्वत:च लढावी लागणार आहे. वंचितशिवाय पर्याय नाही. आरक्षण वाचवायचे असेल तर राजकीय चेहरा उभा करावा लागेल. इतर राजकीय पक्षांकडून ओबीसींचा केवळ सत्तेसाठी वापर केला जातो, अशी टीका ॲड. आंबेडकर यांनी केली.
भाजपचे मेंदू बंद करण्याचे राजकारण
वंचितांना कायम वंचित ठेवण्यासाठी प्रस्थापित समाजाकडून कायम प्रयत्न केला जातो. शिक्षणाद्वारे अनेक अन्यायकारक बाबी मोडीत काढल्या जात आहेत. मात्र, आता शिक्षणापासून दूर ठेवण्याचे षडयंत्र रचणे सुरू आहे. जातीयतेचे विष कालवले. भाजपचे मेंदू बंद करण्याचे राजकारण सुरू आहे, असा आरोप प्रा. अंजली आंबेडकर यांनी केला.