अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची भाजपवर टीका
अफझल गुरूचे जाहीर समर्थन करणाऱ्या ‘पीडीपी’सोबत हातमिळवणी करून भाजपने जम्मू काश्मीरमध्ये सत्ता स्थापन केली. मात्र, त्याच अफझल गुरूवर दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात चर्चा झाली तेव्हा तो राष्ट्रद्रोह कसा ठरला, असा सवाल करीत या प्रकरणात केंद्र सरकारची भूमिका संभ्रम निर्माण करणारी आहे, अशी टीका भारिप बहुजन महासंघाचे प्रमुख, माजी खासदार अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे पत्रकार परिषदेत केली.
जेएनयू आणि रोहित वेमुला प्रकरणात आंबेडकर यांनी आपली भूमिका या वेळी मांडली. या दोन्ही प्रकरणांत केंद्र सरकार संभ्रम निर्माण करीत आहे. एखाद्या संवेदनशील राजकीय मुद्दय़ावर चर्चाच करायची नाही, असे समजणे चुकीचे आहे. केंद्र सरकारच्या या प्रकरणातील चुकीच्या भूमिकेमुळे काश्मीरमधील दहशतवाद्यांना या मुद्दय़ावर एकत्र येण्याची संधी मिळाली, पूर्वी ते विभक्त होते. एका खासगी सर्वेक्षणानुसार काश्मीरमधील ६५ टक्के जनता ही भारताच्या बाजूने आहे, २० टक्के तटस्थ, पण भारताच्या बाजूने झुकावी असणारी आणि उर्वरित जनता भारतविरोधी आहे. तत्कालीन काँग्रेस आणि आता भाजपच्या सरकारने अफझल गुरूच्या फाशीचा मुद्दा चुकीच्या पद्धतीने हाताळल्याने आता सर्व काश्मिरी या मुद्दय़ावर एकत्र आले आहेत, आतापर्यंत त्यांचा आवाज काश्मीरबाहेर जात नव्हता, जेएनयूच्या प्रकरणामुळे तो देशात आणि विदेशातही पोहोचला आहे. कन्हैयावर हल्ला करणाऱ्या वकिलांची सनद रद्द करावी व दोषींवर फौजदारी खटले दाखल करावेत, अशी मागणी त्यांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोदींची रणनीती अपयशी
पाकिस्तानला एफ १६ अत्याधुनिक विमान पुरवठा करण्याचा निर्णय घेऊन अमेरिकेने पाकिस्तानसोबतच असल्याचे स्पष्ट केले आहे. मोदींच्या पाकिस्तानसोबतच्या ‘बॅक डोअर डिप्लोमसी’चे हे अपयश आहे. ते झाकण्यासाठीच जेएनयूचा मुद्दा पेटवला जातो आहे असा आरोप केला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prakash ambedkar criticism to bjp
First published on: 21-02-2016 at 01:20 IST