अकोला : शेगाव येथील श्री संत गजानन महाराज ओबीसी समाजातील लाखोंचे श्रद्धास्थान आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत अकोल्यात दर महिन्यात येतात. मात्र, एकदा तरी शेगावला दर्शनासाठी जातात का? तर अजिबाज नाही. आता मी बोलल्यावर कदाचित ते शेगांवला जातीलही, असा टोला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे लगावला.
धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सवानिमित्त भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने आयोजित धम्म मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर टीकास्त्र सोडले.
पुढे ते म्हणाले, ”महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली आहे. आता शेतकरी विचार करत आहे की, आम्हाला जी खावटी मिळायची ती यावेळी मिळाली नाही. घरातलं सगळं वाहून गेलं आहे, जगण्याचा प्रश्न उभा राहिला आहे. मात्र, भाजप, आरआरएसच्या विचारसरणीत मदत हा शब्दच नाही. त्यामुळे आता तरी धडा शिकला पाहिजे. सत्ताधारी म्हणतात दिवाळीला मदत देऊ. मात्र, दिवाळीला देखील मदत येणार नाही. गरीब, वंचितांना मदत करण्याचा त्यांचा पायंडाच नाही.”
ओबीसींचा घात आरएसएस-भाजपने केला. एवढे तरी ओबीसींनी डोक्यात घ्यावे, तरच ओबीसी आरक्षण वाचेल. स्थानिक पातळीवर जे आरक्षण निघत होते, त्यात ओबीसी नेतृत्व पुढे येत होते. आता ते सुद्धा हातातून जाण्याची शक्यता आहे. नुसते राजकीय आरक्षण जाणार नाही, तर शैक्षणिक आरक्षण सुद्धा जाईल. त्यामुळे ओबीसींनी वेळीच सावध व्हावे. भाजपला मतदान दिले म्हणजे ते आपले मालक झाले नाहीत. जर मालक बनण्याचा प्रयत्न केला तर त्यांना आपटल्या शिवाय राहणार नाहीत, हे लक्षात ठेवा, असे ॲड. आंबेडकर म्हणाले.
प्रगती डोळ्यात खुपते
दलित, वंचित आदिवासी समाजातील उच्चशिक्षित अनेक हुशार तरुणांचा गेल्या १० वर्षात जातीयवादी लोकांनी जीव घेतला. त्यांची प्रगती मनुवाद्यांचा डोळ्यात खुपत होती, त्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली, असा आरोप सुजात आंबेडकर यांनी केला.
व्यापाऱ्यांना कर्जमाफी, शेतकरी वाऱ्यावर – डॉ. पुंडकर
महाराष्ट्रात शेतीमालाला भाव नाही, पण व्यापाऱ्यांना मदत केली जाते. ज्या पक्षांना शेतकऱ्यांनी मते दिली ते सर्व गप्प आहेत. सरकार शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी करीत नाही, ओला दुष्काळ जाहीर करीत नाही. या देशातील व्यापाऱ्यांचे हजारो कोटींचे कर्ज माफ केले जातात पण, शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जात नाही, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी केली.