अकोला : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकारणामुळे भारताचे स्वातंत्र्य धोक्यात आले आहे. जागतिक स्तरावर इतर बहुतांश देशांचा भारताऐवजी पाकिस्तानला पाठिंबा आहे. त्यामुळे युद्ध झाल्यास पाकिस्तानचे भारतावर राज्य देखील येऊ शकेल, असा खळबळजनक आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज येथे केला.

अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी येथे आयोजित कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडत पाकिस्तानसोबत युद्धाचा धोका व्यक्त केला.

निवडणुका जाऊ द्या, भारतावरील संकटावर चिंतन आणि लोकजागृती करण्याची गरज आहे. देश गुलामगिरीत असतांना शुद्र आणि अतिशुद्रांना त्रास झाला नाही तर, सवर्णांना अधिक त्रास झाला. नरेंद्र मोदींच्या राजकारणामुळे देशाचे स्वातंत्र्य धोक्यात आले आहे. आर्मी प्रमुखांनी तीन महिन्यांपूर्वी पाकिस्तानसोबत युद्ध होण्याची शक्यता वर्तवली होती. ती शक्यता खरी ठरू नये. पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर एकेकाळी भारताला मदत करणारे सगळे देश आता पाकिस्तानला मदत करत आहेत. इंग्लंड, अमेरिका, रशिया, आखाती देश पाकिस्तानच्या बाजूने आहेत, असा दावा ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.

नरेंद्र मोदीच्या ‘इगो’मुळे इतर देश आपल्याऐवजी पाकिस्तानकडे वळले. नरेंद्र मोदी स्वत:ला विश्वगुरू समजून इतर देशांचा सातत्याने अपमान करतात. त्यामुळे इतर देश भारताविरोधात नाही, मात्र ते नरेंद्र मोदी विरोधात नक्कीच गेले आहेत. जर पाकिस्तानविरोधात युद्ध झाले आणि भारत हरला तर पाकिस्तानचे राज्य भारतावर आल्या शिवाय राहणार नाही, असे वक्तव्य ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. 

१९७१ मध्ये एका पाकिस्तानचे दोन पाकिस्तान केले होते. त्यामुळे भुट्टो यांनी पाकिस्तानी जनतेला शपथ घातली, आवाहन केले होते की, आज आपण कमकुवत आहोत, म्हणून दोन तुकडे झाले. संधी आली तर भारताचे देखील तुकडे करू. आज भारताचे तुकडे होईल की नाही, हा वेगळा भाग आहे. मात्र, पाकिस्तानला मदत करणाऱ्यांची संख्या वाढली आहे, दुसरीकडे आपली तयारी काय? हे कुणालाच माहीत नाही. युद्ध झाले आणि पाकिस्तान जिंकले तर त्यांचे राज्य येईल. कुटुंब देखील सुरक्षित राहणार नाही, असे ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले. ॲड. आंबेडकर यांच्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे.