नागपूर : स्वातंत्र्यापासून देशातील मुस्लिमांना व्हिलनच्या भूमिकेत बसविण्यात आले. वास्तविक पाकिस्तानातील मुस्लिम आणि भारतीय मुस्लिमांमध्ये टोकाचा फरक आहे. भारतीय मुस्लिमांमधील संत परंपरा पाकिस्तानात नाही, याकडे डोळे झाक केली जाते. गेल्या ७५ वर्षांपासून बसविलेल्या व्हिलनच्या भूमिकेतून देशातील मुस्लिमांना सुटका कधी करणार, असा थेट सवाल वंचित बहूजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भूमीत रविवारी उपस्थित केला.
फुले- आंबेडकर इंटलेक्च्युअल फोरमच्या वतीने ऑपरेशन सिंदूर आणि नंतरच्या घडामोडी हा विषय घेऊन ॲड. आंबेडकर यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कस्तुरचंद पार्क जवळील परवाना भवनच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला.
बाबासाहेबांनी देशातल्या जातीय विभाजनावर पहिल्या गोलमेज परिषदेत परखडपणे इंग्रजांना जे उत्तर दिले होते, ते आजही तंतोतंत लागू पडते, असे स्पष्ट करीत ॲड. आंबेडकर म्हणाले, देशातील मुस्लिम भविष्यात छातीवर बसतील, अशी ओरड धर्मांध शक्ती स्वातंत्र्यापासून करीत आहे. आज स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाली तरी, आपण व्हिलनच्या भूमिकेतून मुस्लिमांची सुटका करायला तयार नाहीत.
आगामी काळात यातून होणाऱ्या संघर्षाच्या भेगा वाढल्या तर त्याला भगदाड पडण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे भारतीय मुस्लिमांच्या बाबतीत भूमिका बदलणे काळाची गरज आहे. देशातील सनातनी विचारसणीचे लोक अविकसित समाजाचे नेतृत्व करीत असल्याने गुळगुळीत राजकारणाचे पेव फुटले आहे. काही बोलायाला गेले तर मागच्या चुकांचा पाढा वाचला जातो. देशापेक्षा स्वतःचे मह्त्व कसे वाढेल, यावर वर्तमानातील राजकारण्यांचा भर आहे, असेही ॲड. आंबेडकर यांनी नमूद केले.
बाबासाहेबांच्या पराजयाचे बिज काश्मिर धोरणात
बाबासाहेब आंबेडकर यांनी हललेल्या लोकसभा निवडणूकीच्या इतिहासाची पाने चाळताना अॅड. आंबेडकर म्हणाले, पाकिस्तान हा मुद्दा भविष्यात रक्तबंबाळ करेल, हे बाबासाहेबांनी ओळखले होते. एक तर काश्मिर घ्या अथवा त्यावर कायमचेपाणी सोडा, असे त्यांचे ठाम मत होते. याला तत्कालिन कॉग्रेस, डावे, हिंदू महासभेने विरोध केला. यातूनच सर्वांनी मिळून बाबासाहेबांना लोकसभेच्या निवडणूकीत पराजित केले. तत्कालिन पंतप्रधानांनी या मुद्दा संयुक्त राष्ट्रात नेल्यामुळे तो आजही चिघळला आहे. देश वारंवारच्या दहशतवादी हल्ल्यांनी रक्तबंबाळ होत आहे. येणाऱ्या काळातही ते थांबेल का, याची शाश्वती नाही,असे परखड निरीक्षणही ॲड. आंबेडकर यांनी नोंदविले.