नागपूर : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या विरुध्द प्रशांत प्रकाश गायकवाड यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. रोजंदारी कामगाराचे पैसे मागायला आलेल्या एका युवकाला जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची ही तक्रार आहे. कुणाल राऊत यांच्या सांगण्यावरूनच ही धमकी दिल्याच्या दावा तक्रारदार युवकाने केला आहे. गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुनसार, ते कुणाल राऊत यांच्याकडे रोजंदारी कामगारांचे पैसे मागायला त्यांच्या घरी गेले होते.
बाहेर उभे असताना गुजरात पासिंगच्या कारमधून अभिषेक वर्धन सिंग व त्याचे तीन ते चार साथीदाराने आपल्याला अडवले. सिंग हा राऊत यांच्या निकटवर्तीय मानला जातो. त्याने आपल्याला शिवीगाळ केली. नंतर गाडीत बसलेल्या एका युवकाने आपल्याला पिस्तूल दाखवत मोबाईल हिसकावून घेतली, असे तक्रारीत म्हटले आहे. तसेच मोबाईलवर गुगल लोकेशन टाकून त्या जागेवार थांबायला सांगितले. थोड्या वेळाने सीताबर्डी पोलीस ठाण्यातून आपल्याला फोन आला. ‘कुणाल राऊत यांनी तुमच्या विरुद्ध तक्रार केली असून तत्काळ पोलीस ठाण्यात हजर व्हा’ असे सांगितले.
अभिषेक सिंगने आपल्याला ‘तुझे ऐसे झुठे केस में फसाऊंगा की जेल मे सडा राहेगा’ अशी धमकी दिल्याचेही प्रशांत याने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. तसेच ‘नागपूर पोलिस मेरेसे डरती है’ असेही त्याने धमकावले. त्यामुळे आपण घाबरून तत्काळ गाडीने मुंबईला निघून गेलो. वाटेत असताना अभिषेक सिंगने अनेक फोन केले.
‘तू कही भी रहे तुझे उठाके लेके आऊंगा, जल्दी वापस आजा’ अशा पुन्हा धमक्या त्याने दिल्या. त्यामुळे आपण आपल्या घराजवळ असलेल्या रायगड जिल्ह्यातील मोहपाडा पोलीस ठाण्यात अभिषेक सिंग व त्याच्या साथीदाराच्या विरोधात अॅट्रोसिटीची तक्रार नोंदवली असल्याचेही गायकवाड याने सांगितले आहे. तसेच त्याने ‘माझ्या जीवाला धोका आहे, मला संरक्षण द्यावे’ अशी विनंतीही केली असून मोबाईल आलेल्या कॉलचे स्क्रिन शॉटही त्याने आपल्या तक्रारीसोबत जोडले आहे. कुणाल राऊत यांच्या सांगण्यावरून या धमक्या देण्यात आल्याचा दावाही प्रशांत गायकवाड याने केला आहे.