नागपूर : काँग्रेसच्या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी विविध व्यापारी, कंत्राटदार कंपन्या आणि खासगी कंपन्यांकडून तब्बल ३९ कोटींहून अधिक रक्कमेचे तात्पुरते कर्ज (हातउसने) म्हणून घेतले आहे. त्यांनी उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या संपत्तीच्या विवरण पत्रातून ही बाब उघड झाली आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरताना उमेदवारांना त्यांच्या संपत्तीचे विवरण सादर करावे लागते. धानोरकर यांनी सादर केलेल्या संपत्ती विवरणानुसार, त्यांची एकूण संपत्ती ८० कोटी ३७ लाख २२ हजार ९५ रुपये असून यामध्ये स्थावर मालमत्ता ३८ कोटी ६१ लाख ५२ हजार ४७९ रुपये आणि जंगम मालमत्ता ४१ कोटी ७५ लाख ६९ हजार ६१६ रुपये आहे. त्यांच्यावर ५५ कोटी २३ लाख ८६ हजार रुपयांचे कर्ज आहे. यामध्ये गृहकर्ज, व्यावसायासाठीचे कर्ज, वाहन खरेदीसाठी बँकांकडून घेतलेल्या १५ कोटी ४४ लाख ८५ हजार रुपये कर्जांसह फक्त तात्पूर्ते कर्ज म्हणून घेतलेल्या तब्बल ३९ कोटी रुपये कर्जाचा समावेश आहे. हे कर्ज त्यांनी विविध खासगी कंपन्या, विविध कंत्राटदार कंपन्या, व्यापारी, गौण खनिज उत्खनन करणारे व्यावसायिक तसेच दीर, सासरे आणि इतर नातेवाईकांकडून घेतले आहे. या कर्जाची रक्कम व्यक्तीनिहाय १० लाख ते ६ कोटी रुपयांच्या घरात आहे. एकाच व्यक्तीकडून चक्क ६ कोटी ४६ लाख १० हजार रुपये घेण्यात आले आहे. त्याचप्रमाणे बांधकाम कंत्राटदार कंपनीकडून ५ कोटी ५० लाख २० हजार रुपये, मार्केटिंग कंपनीकडून ३ कोटी ३ लाख,४०६९ रुपये आणि टेड्रिंग कंपनीकडून १ कोटी १० लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे.

हेही वाचा – यवतमाळ-वाशिममध्ये संजय राठोड विरुद्ध संजय देशमुख ? राठोड म्हणाले, मला उमेदवारी….

हेही वाचा – शरद पवारांच्या तुलनेत देवेंद्र फडणवीस यांच्या फसलेल्या रॅलीची गावभर चर्चा; मात्र, भाजपा नेते म्हणतात…

धानोरकरांकडून प्रतिसाद नाही

यासंदर्भात प्रतिभा धानोरकर यांच्याशी संपर्क साधण्यासाठी दूरध्वनीव्दारे वारंवार प्रयत्न केला. पण त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यांच्या स्वीय सहायकाने ‘‘मॅडमला या विषयाची कल्पना दिली आहे’’ असे लोकसत्ताला सांगितले.