बलात्काराच्या गुन्ह्य़ांमागील अर्थकारणांतून जमवली माया
नागपूर : प्रेमाच्या जाळ्यात ओढून एका व्यक्तीची फसवणूक केल्याप्रकरणी चर्चेत आलेली प्रीती दास हिची पोलीस विभागातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांशी गट्टी होती. या माध्यमातून तिने बलात्कार प्रकरणातील पीडित शोधून गुन्हा दाखल करवून आणि त्यातून अर्थकारण करण्यात ती तरबेज होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील महिला पदाधिकाऱ्यांशी तिचे मतभेद निर्माण झाले, अशी माहिती समोर येत आहे.
प्रीती ज्योतिर्मय दास (३९) कामठी रोड हिच्याविरुद्ध काही दिवसांपूर्वी पाचपावली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तेव्हापासून ती फरार आहे. उमेश ऊर्फ गुड्ड देविशंकर तिवारी (५०) यांना तिने फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. फेसबुकवरूनच संवाद साधून संपर्क क्रमांक घेतला. पत्नीशी फारकत घेऊन एकत्र राहण्याचे स्वप्न दाखवून घर विकत घेण्याच्या नावाने १४ लाख ८७ हजार ६०० रुपयांनी त्यांची फसवणूक केली.
सामाजिक कार्याच्या नावावर गोरखधंदा
शहरात अनेक महिला सामाजिक कार्यकर्त्यां असून त्या बलात्कार पीडितांच्या मदतीसाठी धावून जातात. पण, त्यामागे मोठे अर्थकारण असते. अनेकदा तक्रारदार महिला तयार नसताना त्यांना पैशांचे आमिष दाखवले जाते व बलात्काराची तक्रार द्यायला लावली जाते. यातून लाखो रुपये मिळाल्यानंतर ते आपापसात वाटून घेतले जातात. यात प्रामुख्याने देहविक्री होत असलेल्या क्षेत्रात सामाजिक कार्यकर्ता म्हणून कार्य करणाऱ्या अनेक महिलांचा समावेश असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे.