महाविद्यालयांमध्ये नाटकांची तालीम जोरात, १२ डिसेंबरला सायंटिफिक सभागृहात आयोजन

नागपूर : महाविद्यालयीन नाटय़विश्वाला हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेची नागपूर विभागीय अंतिम फेरी आता दोन दिवसांवर येऊ न ठेपली आहे. त्यामुळे प्राथमिक फेरीमधून निवड झालेल्या नाटकांची कसून तालीम सुरू असून महाविद्यालयांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. १२ डिसेंबला लक्ष्मीनगरस्थित सायंटिफिक सभागृहात नागपूर विभागीय अंतिम फेरी रंगणार आहे.

नागपूर विभागातून पाच एकांकिकांची विभागीय अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. यामध्ये मुक्ताई, अतिथी, दिव्यदान, हिरवीन आणि तमासगीर यांचा समावेश आहे. काहींनी तर रंगीत तालीम सुरू केली आहे. विभागीय फेरीतून प्रथम येणाऱ्या एकांकिकेची मुंबईत रंगणाऱ्या महाअंतिम फेरीसाठी निवड होणार आहे. विद्यार्थ्यांसाठी विभागीय फेरी ही आव्हानात्मक असते. तसेच या स्पर्धेकडे मराठी नाटक, चित्रपट, मालिका क्षेत्रातील मान्यवरांचे लक्ष असते. या स्पर्धेला महाविद्यालयीन नाटय़विश्वात विशेष प्रतिष्ठा लाभली आहे. यंदाही या स्पर्धेविषयी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. एकांकिकेसाठीच्या नेपथ्यावर शेवटचा हात फिरवणे, आवश्यक असलेले अन्य साहित्य उपलब्ध करणे, प्राथमिक फेरीमध्ये परीक्षकांकडून मिळालेल्या सूचनांनुसार नाटकांची बांधणी करणे, पाश्र्वसंगीताचे नियोजन करण्याच्या कामांमध्ये विद्यार्थी व्यस्त आहेत.

प्राथमिक फेरीतून निवड झाल्यामुळे आता विभागीय अंतिम फेरीचे काहीसे दडपण आहे. यावेळी खऱ्या अर्थाने कस लागणार आहे. त्याशिवाय महाअंतिम फेरी मुंबईत होत आहे. त्यामुळे आमची एकांकिका प्रभावी होण्यासाठी, अपेक्षित आशय पोहोचवण्यासाठी सादरीकरणावर बारकाईने काम करीत आहोत.

– श्रेयश अतकर, व्हीएमव्ही महाविद्यालय.

 

प्रायोजक

लोकसत्ता आयोजित ‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत लोकांकिका स्पर्धा ‘अस्तित्त्व’च्या सहकार्याने पार पडणार आहे. ‘इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड’, ‘कमांडर वॉटर टेक प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘एम. के. घारे ज्वेलर्स’ पावर्ड बाय असलेल्या या स्पर्धेसाठी ‘मे.बी.जी चितळे डेअरी’ आणि ‘झी टॉकीज’ असोसिएट पार्टनर आहेत. लोकांकिकेच्या मंचावरील कलाकारांच्या कलागुणांना चित्रपट मालिकेत संधी देणारे ‘आयरिस प्रॉडक् शन’ टॅलेंट पार्टनर आहेत.