नागपूर : लंडन येथे नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्ड टीम ब्लिट्झ अजिंक्यपद स्पर्धेत नागपूरच्या आंतरराष्ट्रीय मास्टर आणि वुमन ग्रँडमास्टर दिव्या देशमुख हिने ऐतिहासिक कामगिरी केली. स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील दुसऱ्या टप्प्यात तिने जगातील महिला बुद्धिबळातील अव्वल क्रमांकावरील खेळाडू हाऊ यिफान हिला पराभूत केले. या विजयानंतर दिव्याचे नाव केवळ देशातच नव्हे तर संपूर्ण बुद्धिबळविश्वात उंचावले आहे.

ही लढत तब्बल ७४ चालींपर्यंत रंगली. सुरुवातीला दोन्ही खेळाडू समसमान ताकदीने खेळत होत्या, मात्र अंतिम टप्प्यात हाऊ यिफान हिने तिच्या राजा-बिशपच्या संरचनेत एक चूक केली आणि दिव्याने नेमकी संधी साधत सामना जिंकला. तिचा हा विजय बुद्धिबळातील उत्कृष्ट डावपेच, संयम आणि मानसिक ताकदीचे प्रतीक ठरला. ही स्पर्धा फिडेने आयोजित केलेल्या ब्लिट्ज टीम चॅम्पियनशिप २०२५ चा भाग होती.

दिव्या हेक्झामाईंड चेस क्लब या संघाकडून खेळत होती. ब्लिट्झ विभागात दिव्याने आठपैकी सहा सामने जिंकले तर एक सामना तिने बरोबरीत राखला आणि केवळ एक सामना गमावला. तिचे प्रदर्शन रेटिंग २६०६ इतके प्रभावी ठरले. या कामगिरीच्या जोरावर तिच्या संघाने उज्बेकिस्तानला ३.५ – २.५ अशा फरकाने पराभूत करत ब्लिट्झ टीम कांस्य पदक पटकावलं. याशिवाय रॅपिड विभागात संघाला रौप्य पदक, आणि दिव्याला वैयक्तिक कांस्य पदकही मिळाले.

काय म्हणाले मोदी?

दिव्याच्या या ऐतिहासिक विजयाची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही घेतली. त्यांनी एक्स वरून दिव्याचे अभिनंदन करत लिहिले, “दिव्या देशमुख हिने जागतिक क्रमवारीतील अव्वल हाऊ यिफानला पराभूत केल्याबद्दल अभिनंदन. तिचा हा विजय तिच्या चिकाटीचे आणि निर्धाराचे प्रतीक आहे. तिची ही कामगिरी अनेक उदयोन्मुख बुद्धिबळपटूंना प्रेरणा देणारी आहे. तिच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा!” मोदींच्या या शुभेच्छांमुळे दिव्याची राष्ट्रीय स्तरावर चर्चा होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिव्या देशमुख ही भारताच्या युवा बुद्धिबळपटूंपैकी एक आहे. तिने २०२४ मध्ये अंडर-२० महिला जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद जिंकून आधीच आपल्या नावावर एक मोठे यश नोंदवले होते. तिने अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना पदके पटकावली आणि आता तिचे नाव भारतीय महिला बुद्धिबळाच्या नव्या चेहऱ्यांपैकी एक म्हणून घेतले जाते. याशिवाय तिने आशियाई आणि जागतिक स्तरावर अनेक स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत सुवर्ण, रौप्य व कांस्य अशी विविध पदके जिंकली आहेत.