नागपूर : अयोध्या येथील राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या ऐतिहासिक सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे विशेष पाहुणे म्हणून पहिल्यांदाच एकत्र आले होते.

पंतप्रधान झाल्यानंतर मोदी आणि सरसंघचालक हे सार्वजनिक व्यासपीठावर यानिमित्त पहिल्यांदाच एकत्र आले होते. त्यानंतर आता नागपुरात होणाऱ्या संघ परिवारातील एका कार्यक्रमा निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक भागवत एका व्यासपीठावर येणार आहेत.

३० मार्च रोजी गुढीपाडव्याच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत नागपुरात एका कार्यक्रमानिमित्त व्यासपीठावर एकत्र येण्याची शक्यता आहे. माधव नेत्रालयाच्या नवीन इमारतीचा भूमिपूजन सोहळा यावेळी होणार आहे. माधव नेत्रालय आय इन्स्टिट्यूट आणि रिसर्च सेंटर हे संघाशी संबंधित आहे. सध्या नेत्रालय वर्धा रोडवर असलेल्या गजानननगरमध्ये सेवा देत आहे. माधव नेत्रालयाची नवीन इमारत हिंगणा रोडवरील वासुदेवनगर मेट्रो स्टेशनजवळ ६.८ एकर परिसरात प्रस्तावित आहे.

या नेत्र संस्थेत रुग्णांना अत्याधुनिक सेवा पुरविल्या जाणार आहेत. गुढीपाडव्याला सकाळी १० वाजता संस्थेतर्फे नवीन इमारतीचा पायाभरणी समारंभ होणार आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रित करण्यात आले आहे. पंतप्रधान कार्यालयाने या निमंत्रणाला मान्यता दिल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे डॉ. मोहन भागवत असतील.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, गोविंदगिरी महाराज, अवधेशानंद गिरी महाराज यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोदी-भागवत एका व्यासपीठावर आलेच नव्हते

एका वर्षापूर्वी नागपूरमधील संघाशी संबंधित राष्ट्रीय कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या लोकार्पण समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना एका व्यासपीठावर आणण्याचे प्रयत्न भाजप नेत्यांनी केले होते. पण त्याला यश आले नव्हते. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना निमंत्रित करून पुन्हा ‘भागवत-शहा’ यांना एका व्यासपीठावर असा योग जुळवून आणण्याचा प्रयत्न झाला. पण ऐनवेळी शहा यांचाही दौरा अचानक रद्द झाला होता. त्यानंतर आता माधव नेत्रालयाच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्यानिमित्त मोदी आणि भागवत एकत्र येणार अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.