वर्धा : अनेक वर्ष शासकीय किंवा निमशासकीय सेवा केल्यानंतर निवृत्त होण्याची मुदत येऊन ठेपते. निवृत्ती दिनांकपूर्वी सर्व ते कागदोपत्री सोपस्कार पूर्ण करणे अनिवार्य असते. तेव्हाच पुढे पेन्शन किंवा अन्य लाभ पदरात पडतात. तसेच निवृत्तीपूर्वी अपेक्षित प्रशिक्षण किंवा आवश्यक तरतुदी मार्गी लावणे पण अपेक्षित असते. आता राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पूणे तर्फे या अनुषंगाने सजग करण्यात आले आहे. माहे एप्रिल २०२६ मध्ये निवृत्त होणाऱ्या मुख्याध्यापक किंवा शिक्षक यांना ही सूचना आहे. संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे एप्रिल – मे २०२५ या कालावधीत वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण आयोजित केल्या जात आहे. या प्रशिक्षणासाठी सध्या ऑनलाईन नावं नोंदणी प्रक्रिया २१ एप्रिलपासून सूरू करण्यात आली.

या नाव नोंदणी प्रक्रियेत ३० एप्रिल २५ पर्यंत १२ वर्ष अर्हताकारी सेवा अथवा २४ वर्ष अर्हताकारी सेवा पूर्ण केली असेल असेच शिक्षक व मुख्याध्यापक नोंदणी करू शकत होते. मात्र बाब पुढे आली. राज्यात काही शिक्षक किंवा मुख्याध्यापक हे ३० एप्रिल २५ ते ३० एप्रिल २६ या कालावधीत २४ वर्ष सेवा पूर्ण करीत आहे आणि ते माहे एप्रिल २०२६ पूर्वी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांचा सेवानिवृत्तीचा कालावधी लक्षात घेतल्यास जे शिक्षक किंवा मुख्याध्यापक ३० एप्रिल २५ ते ३० एप्रिल २६ या कालावधीत निवृत्त होत असल्याने व सेवेची २४ वर्ष पूर्ण होत असल्याने अशा शिक्षक व मुख्याध्यापक यांना नाव नोंदणीसाठी करण्याची सुविधा १ मे २०२५ रोजी सकाळी ११ पासून उपलब्ध करून देण्यात आली आहे.

तसेच सर्वांसाठीच ही सुविधा ६ मे पर्यंत सायंकाळी ६ पर्यंत उपलब्ध राहणार असून ही अंतिम मुदतवाढ आहे. पात्र शिक्षक व मुख्याध्यापक यांना निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणासाठी नोंदणी करण्याची सूचना चारही गटातील शिक्षक व मुख्याध्यापक संवर्गातील संबंधितांना देण्याचे शिक्षणाधिकाऱ्यांना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने सूचित केले आहे.निवडश्रेणी लागू झाल्यास वेतनात मोठा फरक पडत असतो. मात्र त्यासाठी विशेष प्रशिक्षण आवश्यक ठरते. ते झाले नसल्यास वेतनश्रेणी लागू होण्यास शिक्षक किंवा मुख्याध्यापक अपात्र ठरतात. हे लक्षात ठेवून वंचित ठरू शकणाऱ्या शिक्षकांना ही मुदतवाढ देण्यात आल्याचे म्हटल्या जाते.