अकोला : दिवाळी सणानिमित्त बाहेर गावी जाणाऱ्या प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळत असते. या पार्श्वभूमीवर खासगी बसमालक अवाजवी भाडे आकारुन प्रवाशांची आर्थिक लूट करतात. हे टाळण्यासाठी खासगी बसमालकांवर कारवाईची मोहीम प्रादेशिक परिवहन विभागाने सुरू केली. या प्रकाराविरोधात तक्रार दिल्यास थेट संबंधित बसमालकावर गंभीर कारवाई होणार आहे.

वर्षातील सर्वात मोठा सण म्हणून दिवाळी ओळखली जाते. दिवाळी सणात प्रत्येकाला आपल्या घराची ओढ लागते. त्यातून बाहेरगावी असणारे प्रत्येक जण आपल्या गावाच्या दिशेने रवाना होतात. दिवाळी सणानिमित्त व त्यानंतर सुट्टीच्या काळात देखील मोठ्या प्रमाणात नागरिक प्रवास करतात. आपल्या कुटुंबियांना भेटण्यासह सणानिमित्त आपल्या गावी जाण्यासाठी खासगी मोटारींनी प्रवास करीत असतात. या गर्दीचा फायदा घेण्याचा प्रकार खाजगी बस मालकांकडून सर्रासपणे होतो. खासगी प्रवाशी बस मालक आणि ऑनलाईन तिकिट नोंदणी करणाऱ्यांकडून तिकीट दरांमध्ये प्रचंड वाढ केली जाते. अवाजवी दर आकारले जातात. यामुळे नागरिकांचे आर्थिक लूट होते.

नागरिकांना अशा वाढीव दरांमुळे प्रवास परवडत नाही. त्यांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. या सर्व प्रकारावर परिवहन विभागाने कारवाईची मोहीम सुरू केली आहे. ३ नोव्हेंबरपर्यंत ही मोहीम राबविण्यात येणार आहे. खासगी प्रवासी बसगाड्यांची तपासणी व भाडे आकारणी आदी बाबी तपासण्यात येणार असल्याचे परिवहन विभागाकडून सांगण्यात आले.

खासगी बसचालकांनी शासन निर्णयानुसार बसचे भाडे हे राज्य परिवहन बस भाड्यापेक्षा दीड पटीपेक्षा अधिक आकारु शकत नाही. तपासणीमध्ये असे आढळून आल्यास कारवाई करण्यात येणार आहे. वाहनांची सखोल तपासणी करण्यात येऊन मोटार वाहन कायदा व त्याअंतर्गत असलेल्या नियमानुसार वाहनावर कडक कारवाई करण्यात येईल, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांनी सांगितले.

सणासुदीच्या काळात शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे खासगी बसचे भाडे हे राज्य मार्ग परिवहन बसच्या दीड पटपर्यंत वाढवण्याची बस मालकांना परवानगी आहे. खासगी बस मालक प्रवाशांकडून राज्य परिवहन बसच्या भाड्याच्या दीड पटीपेक्षा अधिक भाडे घेत असेल तर प्रवाशांनी घेतलेल्या भाड्याच्या रकमेच्या तिकीटाची मागणी करावी, त्याआधारे परिवहन कार्यालयाच्या ई-मेल आयडी dyrto.30-mh@gov.in वर तक्रार करता येईल. त्या खासगी बसेसवर मोटार वाहन कायदा व त्या अंतर्गत असलेल्या नियमांनुसार कारवाई करण्यात येईल, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार म्हणाले.