नागपूर : देशभरात नीट परीक्षेच्या घोळाबाबत विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये प्रचंड रोष बघायला मिळत आहे. यामुळे स्पर्धा परीक्षांच्या पारदर्शकतेबाबत विद्यार्थ्यांमध्ये संशय निर्माण झाला आहे. यात नॅशनल टेस्टिंग एजेन्सी (एनटीए) मार्फत घेतल्या जाणाऱ्या जेईई मेन्स परीक्षेत नवा घोळ झाल्याचे प्रकरण समोर आले.

तन्मय विनोद पाटील या विद्यार्थ्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याबाबत याचिका दाखल केली. विद्यार्थ्याने याचिकेत आरोप केला आहे की त्याने यंदा दिलेल्या जेईई मेन्स परीक्षेत एनटीएकडून घोळ करण्यात आला. परीक्षेत त्याला एमआर-१७००५७५९ हा रोल नंबर दिला गेला. परीक्षा झाल्यावर या रोल नंबरवर गुण तपासले असता तन्मयला ८९.८२ पर्सेंटाईल मिळाल्याचे दाखविण्यात आले. मात्र याच रोल नंबरचा वापर करून दुसऱ्यांदा गुण तपासल्यावर विद्यार्थ्याला २९.८२ पर्सेंटाईल दाखविण्यात आले. याचिकाकर्त्या विद्यार्थ्याने हा गोंधळ परीक्षा घेणारी संस्था एनटीएकडून झाला असल्याचा दावा केला. याबाबत त्याने १४ जुलै रोजी एनटीएकडे ईमेलच्या माध्यमातून तक्रारही केली. यावर एनटीएच्या वतीने उत्तर देण्यात आले की विद्यार्थ्याने परीक्षेसाठी दोनदा नोंदणी केली. त्यामुळे हा घोळ झाला आहे. जेईई मेन्स परीक्षेतील नियमांचे उल्लंघन केल्यामुळे सायबर पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्याचा इशाराही एनटीएने विद्यार्थ्याला दिला. दुसरीकडे, विद्यार्थ्याने दोनदा नोंदणी केली असल्याचा दावा फेटाळून लावला. विद्यार्थ्याने याप्रकरणी १६ जुलै रोजी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली.

हेही वाचा – चंद्रपूर: चिचपल्ली येथील मामा तलाव फुटला! ३०० घरांमध्ये पाणी शिरले

१८ जुलै रोजी न्या. नितीन सांबरे आणि न्या. अभय मंत्री यांच्या खंडपीठासमक्ष सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान याचिकाकर्ता विद्यार्थी यांनी न्यायालयाला सांगितले की त्यांच्याकडून केवळ एकदा नोंदणी करण्यात आली. न्यायालयाने विद्यार्थ्याला एका आठवड्यात याबाबत लिखित स्वरुपात माहिती सादर करण्याचे आदेश दिले. याचिकेवर पुढील सुनावणी २५ जुलै रोजी होणार आहे. याचिकाकर्त्या विद्यार्थ्याच्यावतीने ॲड.एस. पालीवाल यांनी बाजू मांडली.

हेही वाचा – बुलढाणा: सव्वादोन लाख शेतकऱ्यांना पिकविम्याची प्रतीक्षाच! मुख्यमंत्र्यांना साकडे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘एनटीए’ काय आहे?

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) ही भारताच्या शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाअंतर्गत येणारी एक स्वायत्त संस्था आहे. स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यासाठी नोव्हेंबर २०१७ मध्ये याची स्थापना करण्यात आली. अभियांत्रिकी, औषध, व्यवस्थापन आणि फार्मसीशी संबंधित उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश आणि फेलोशिपसाठी राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा एनटीएमार्फत घेतल्या जातात. अलिकडेच, वैद्यकीय पदवी प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या नीट परीक्षेत झालेल्या गोंधळामुळे एनटीए चर्चेत आली. अनेक राज्यांमध्ये एनटीएद्वारे घेण्यात आलेल्या परीक्षा पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.