यवतमाळ : येथून जवळच असलेल्या जांब गावात १ व २ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या ६९व्या विदर्भ साहित्य संमेलनाच्या माध्यमातून ‘वैयक्तिक अजेंडा’ यशस्वी करण्यासाठी विदर्भ साहित्य संघाचा वापर होत आहे, असा गंभीर आरोप इंग्रजी साहित्याचे प्राध्यापक आणि विदर्भ साहित्य संघाचे सभासद डॉ. विवेक विश्वरुपे यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपाने विदर्भातील साहित्यविश्वात खळबळ माजली आहे.
‘शंभर वर्षांची परंपरा असलेल्या विदर्भ साहित्य संघासारख्या नामवंत संस्थेचा वापर काही आयोजक केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी आणि साहित्यबाह्य ‘अजेंडा’ पुढे नेण्यासाठी करत आहेत. जांब-यवतमाळ येथे झालेल्या या संमेलनाने या संस्थेच्या प्रतिष्ठेलाच तडा दिला आहे’, असा आरोप प्रा. विश्वरूपे यांनी केला आहे. हे साहित्य संमेलन यवतमाळात व्हावे यासाठी साहित्याचा गंध नसलेल्या लोकांनी एकत्र येत वि.सा. संघाचे सदस्यत्व स्वीकरून संमेलन घेण्याचा प्रस्ताव पाठवला.
संमेलनावर टीका होवू नये यासाठी कुठल्याही वादात न पडणारे साहित्यिक डॉ. रमाकांत कोलते यांची निवड करून त्यांना संमेलनाध्यक्ष घोषित केले. या सर्व उठाठेवीमागे विशिष्ट अजेंडा असल्याचा आरोप प्रा. डॉ. विश्वरूपे यांनी केला आहे.
२०१९ मध्ये यवतमाळमध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे प्रथम कार्यवाह म्हणून काम पाहिलेल्या डॉ. विश्वरुपे यांनी विदर्भ साहित्य संमेलनाच्या दर्जाबाबत तुलना करताना म्हटले की, १९९९ साली उमरखेड येथे झालेले संमेलन खऱ्या अर्थाने रसिकांच्या सहभागाने आणि सर्वसमावेशकतेने भरलेले होते. त्या वेळच्या संमेलनाने विदर्भाच्या साहित्य परंपरेला खरा मान मिळवून दिला होता.
त्यांच्या मते, जांब-यवतमाळ येथील संमेलनाच्या आयोजकांनी संकुचित दृष्टिकोन बाजूला ठेवून, मनाचा मोठेपणा दाखवत, विदर्भ साहित्य संघाच्या सर्व शाखा, पदाधिकारी आणि लेखक-कवी, पत्रकारांना सहभागी करून घेतले असते, तर हे संमेलनही ‘उमरखेड पॅटर्न’प्रमाणे यशस्वी ठरले असते. संमेलन गावाच्या बाहेर भरविल्यामुळे सामान्य रसिकांना त्याचा आस्वाद घेता आला नाही. तसेच आयोजकांनी साहित्य क्षेत्राशी संबधितांना निमंत्रण न देता एका शाळेतील विद्यार्थी, काही संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनाच महत्वाचे स्थान दिल्याची ओरड आता होत आहे.
उमरखेड येथील एका शेतीनिष्ठ सेवानिवृत्त अधिकारी असलेल्या लेखकानेही या साहित्य संमेलनावर टीका केली. या आरोपांमुळे विदर्भ साहित्य संघाच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वि.सा. संघाच्या जबाबदार सदस्याने हे आरोप केल्याने त्याचे गांभीर्य वाढले असून विदर्भ साहित्य संघ याबाबत काय भूमिका घेते याकडे साहित्य विश्वाचे लक्ष लागले आहे.
