लोकसत्ता टीम

नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने नुकतीच विविध पदांसाठी जम्बो भरती केली होती. त्यानंतर आता सहाय्यक प्राध्यापकांच्या शेकडो जागांवर भरती केली जाणार आहे. यासाठी आयोगाने नुकतीच जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यामुळे अनेक दिवसांपासून प्राध्यापक भरतीची वाट पाहणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत शासकीय औषधनिर्माण महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक, गट-अ संवर्गातील पदभरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (जा.क्र.०५०/२०२३) प्रसिद्ध करण्यात आली आहे. एकूण पदसंख्या ०६ राहणार आहे, तर अर्ज करण्याची अंतिम मुदत २५ सप्टेंबर २०२३ आहे.

आणखी वाचा-भाजप आमदारांच्या आश्रमशाळेत विद्यार्थ्याचा मृत्यू; आदिवासी आश्रमशाळांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर!

याशिवाय शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विविध विषयातील सहयोगी प्राध्यापक, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट-अ संवर्गातील पदभरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (जा.क्र.४९/२०२३) प्रसिध्द करण्यात आली आहे. एकूण पदसंख्या – १०८ आहे. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विविध विषयातील सहायक प्राध्यापक, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट-अ संवर्गातील पदभरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (जा.क्र.४८/२०२३) प्रसिध्द करण्यात आली आहे. एकूण १४९ पदांसाठी ही भरती होणार असून सर्व जाहिरातींसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत २५ सप्टेंबर २०२३ आहे.