रवींद्र जुनारकर

आगामी जिल्हा परिषद, नगर परिषद व महापालिका निवडणुका पाहता राजकारणात सक्रिय असलेल्या सर्वपक्षीय पुढाऱ्यांनी गणेशोत्सवाच्या माध्यमातून जनसंपर्क अभियान सुरू केले आहे. गणेशोत्सवाचा समाजकारणाऐवजी राजकारणासाठी वापर केला जात आहे. सध्याच्या गणेशोत्सवात समाजकारण कमी तर राजकारणच जोरात सुरू आहे.

हेही वाचा >>> नागपूर : हत्ती स्थलांतरणाबाबत न्यायालयाकडून स्वत:हून याचिका ; केंद्रीय पर्यावरण मंत्रालय, राज्य सरकारला नोटीस

स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली होती. भारतीय स्वातंत्र्य लढ्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या व्यासपीठाचा वापर केला. कालांतराने गणेशोत्सवाचे स्वरूप बदलत गेले. आता तर सर्वपक्षीय राजकारण्यांनी गणेशोत्सवाचा राजकारणासाठी वापर सुरू केला आहे. या माध्यमातून नेते जनसंपर्क अभियान राबवत आहेत. नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात जिल्हा परिषद, नगर परिषद व महानगरपालिका निवडणुका अपेक्षित आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व पक्षाचे नेते विविध मंडळांच्या गणेशमूर्तीसमोर नतमस्तक होताना दिसत आहे.

राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शहरातील काही गणेश मंडळांच्या मंडपाला भेटी देत गणरायाचे दर्शन घेतले. माजी उपमहापौर राहुल पावडे यांच्या सिव्हिल प्रभाग, माजी नगरसेविका संगीता खांडेकर यांच्या मजदूर गणेश मंडळाला त्यांनी रात्री उशिरा भेट दिली. चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार हेदेखील गणेश मंडळांना भेटी देण्यात मागे नाहीत. घरगुती गणपतीपासून तर सार्वजनिक गणेश मंडळांपर्यंत सर्वत्र आ। जोरगेवार यांची उपस्थिती दिसत आहे. ते गणेशोत्सवानिमित्त सार्वजनिक मंडळांसोबतच पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्र, नातेवाईक यांच्या घरी सुरू जेवणावळीतही प्रामुख्याने हजेरी लावत आहे. माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनीही गणेश मंडळांना भेटी देण्याचा सपाटा सुरू केला आहे. काँग्रेस खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर यांनीही त्यांच्या लोकसभा व विधानसभा मतदार संघातील सार्वजनिक गणेश मंडळ तथा पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या घरी श्री गणेशाचे दर्शन घेतले. खा. धानोरकर यांनी त्यांच्या चंद्रपूरच्या जनसंपर्क कार्यालयात गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती.

हेही वाचा >>> नागपूर : हत्ती स्थलांतरणाबाबत न्यायालयाकडून स्वत:हून याचिका ; केंद्रीय पर्यावरण मंत्रालय, राज्य सरकारला नोटीस

माजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार, काँग्रेस आमदार सुभाष धोटे, चिमूरचे भाजप आमदार बंटी भांगडिया यांनीदेखील या माध्यमातून गणरायाचे दर्शन घेतले. राजुरा विधानसभा मतदारसंघात तर आ. धोटे यांच्या हस्ते एका गावात गणपतीची प्रतिष्ठापनादेखील झाली. केवळ मंत्री, खासदार, आमदारच नाही तर विविध राजकीय पक्षांचे माजी महापौर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, माजी नगरसेवक, नगरसेविका, जिल्हा परिषद अध्यक्ष यांनीही गणेशोत्सवाच्या माध्यमातून जनसंपर्क अभियान राबवण्यास सुरुवात केली आहे. काही माजी नगरसेवक, नगरसेविका गणेश मंडळात स्वत: पदाधिकारी आहेत. त्यामुळे त्यांनीही विविध कार्यक्रम राबवून निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राजकीय गणित जुळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ग्रामीण भागातही गणेशोत्सवाचा जोर दिसत आहे. काही माजी नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांनी तर स्वत:च गणेशोत्सवानिमित्त जेवणावळीची तयारी सुरू केली आहे.

गेली दोन वर्षे करोनाची लाट होती. त्यामुळे गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा झाला. आता करोना प्रादुर्भाव ओसरल्यामुळे राज्यात सर्वत्र गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जात आहे. दोन वर्षांचा खंड आणि आगामी निवडणुका लक्षात घेत राजकीय नेत्यांनी या उत्सवाच्या माध्यमातून आपले जनसंपर्क अभियान सुरू केले आहे.