काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी नागपूरचे कार्यकर्ते उत्साही असून त्यांची जोमात तयारी केली आहे. विशेष म्हणजे महात्मा गांधी यांच्या वास्तव्याने पवित्र झालेल्या सेवाग्राम येथील माती यात्रेसाठी घेऊन जाण्याचा संकल्प करण्यात आला आहे. यात्रेदरम्यान हिंगोली येथे राहुल गांधी यांच्या हस्ते वृक्षरोपण केले जाणार आहे. त्यासाठी सेवाग्राम येथील माती वापरली जाणार आहे.
हेही वाचा >>>चंद्रपूर: दिवाळीत वाघोबाची आणि नागाची पूजा; गोंड गोवरी समाजाची ४५० वर्षांची परंपरा
ही यात्रा तेलंगणातून महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे ७ नोव्हेंबरला येत आहे. मराठवाड्यातील नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात १५ नोव्हेंबर ही यात्रा आहे. विदर्भातील वाशिम, अकोला आणि बुलढाणा १५ ते २० नोव्हेंबर दरम्यान ही यात्रा राहणार आहे.यात्रेसाठी नागपूर शहर काँग्रेसने जोरदार तयारी सुरू केली आहे. तसेच प्रदेश कार्यकारिणीतील पदाधिकारी व हवाई दलातील निवृत्त अधिकारी संदेश सिंगलकर यांनी सेवाग्राम येथील माती घेऊन यात्रेत सहभागी होण्याचा संकल्प केला आहे. ही माती घेऊन ते हिंगोलीला जातील आणि तेथे राहुल गांधी यांच्या हस्ते वृक्षारोपण केले जाणार आहे. त्यासाठी सेवाग्रामची मातीचा वापर केला जाणार आहे.
हेही वाचा >>>नागपूर: राजुरा येथे एक देशी कट्टा, चार जिवंत काडतूस जप्त; विक्री करणारा पोलिसांच्या ताब्यात
तसेच भारत जोडो यात्रेसाठी नागपुरातून काँग्रेसचे दोन हजार कार्यकर्ते शेगावकडे रवाना होणार आहेत. तेथे १७ नोव्हेंबरला राहुल गांधी यांची सभा होणार आहे. त्यासाठी नागपुरातील प्रत्येक ब्लाॅक अध्यक्षांनी १०० कार्यकर्त्यांची यादी करण्यात आली आहे. शहरातून २००० कार्यकर्ते नेण्याचे नियोजन करण्यात आले आले. त्याकरिता बसेसची व्यवस्था करण्यात येणार आहे. यात्रेत सहभागी होण्यापूर्वी २८ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबरपर्यंत ब्लाॅकनिहाय, विधानसभानिहाय चौकाचौकात सभा व पत्रक घेऊन पदयात्रा काढण्यात येणार आहे.