नागपूर : लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन कशाप्रकारे ऑटोमॅटिक आणि तंत्रज्ञानाचा वापर करून मतदार यादीतील विरोधी पक्षाचे समर्थित मतदार वगळण्यात आले आणि त्याच पद्धतीने बनावट मतदार यादीत समावेश करून घेण्याचा आरोप केला. त्यावर आता विविध पक्षांतील नेते प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राहुल गांधी यांनी निवडणूक प्रक्रियेबद्दल जे भाष्य केले आहे ते बालिशपणाचे आहे अशी टीका केली आहे. ते म्हणाले निवडणूक प्रक्रिया समजून घेणे त्यांना आवश्यक आहे. कदाचित त्यांचे सल्लागार त्यांना बूथ लेवलपासून मतदार यादी तयार होणे आणि मतदान प्रक्रिया संपूर्ण प्रक्रियेची माहिती त्यांच्यापासून लपवून ठेवत असतील, असेही तटकरे म्हणाले. त्यांच्या सल्लागारांना राहुल गांधी यांची बदनामी करायची असेल, असा दावाही केला.

सुनील तटकरे आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नागपूर शहर कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय चिंतन शिबिर उद्या, नागपुरात आयोजित करण्यात आले आहे. त्यासाठी सुनील तटकरे नागपुरात आहेत.

राहुल गांधी यांनी वेगवेगळ्या ठिकाणी निवडणूक प्रक्रियेत अनियमितता, मतदारांची यादी व मतदान पद्धतीतील अपूर्णांकांसह “मत चोरी” या विषयांवर वारंवार टीका केली आहे. त्यांनी कर्नाटकातील अलंद मतदारसंघाचे उदाहरण दिलं आहे जिथे त्यांच्या म्हणण्यानुसार हजारो मतदारांची नावे सहभागी असून तांत्रिक पद्धतीने किंवा ऑनलाईन अर्जाद्वारे चुकीने नावे काढण्यात आल्याचा आरोप आहे. महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदारसंघात अशाच पद्धतीने बोगस मतदारांचा मतदार यादीत समावेश करण्यात आला आहे असे राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पत्रकार परिषदेत त्यांनी “हायड्रोजन बम” अशी चेतावणी दिली – म्हणजे येत्या काळात मतदान प्रक्रियेत किंवा मतदारयादीतील त्रुटींशी संबंधित काही मोठा खुलासा होऊ शकतो अशा संकेत दिले आहेत.

सुनील तटकरे म्हणाले, प्रत्येक पक्षाचा बीएलओ असतो, मतदार यादी तयार करणे, ती तपासणे तसेच मतदान केंद्रावरसुद्धा प्रत्येक पक्षाचा प्रतिनिधी असतो तो मतदाराची ओळख पटवून घेऊ शकतो तरीदेखील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी अशा प्रकारचा आरोप करत असतील तर तो चुकीचा आहे, तो एक कथानक तयार करण्याचा प्रयत्न आहे. मतदार सुज्ञ आहे, असेही ते म्हणाले