गुन्ह्याला प्रशासनाकडूनच प्रोत्साहन; अनेक कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : रुळ केवळ रेल्वेगाडय़ांसाठी असा नियम असून त्यावर चालणे किंवा ते ओलांडणे गुन्हा मानले जात असले तरी कळमना रेल्वे स्थानकावर गार्डस आणि इंजिन चालकांना अशाप्रकारे रुळ ओलांडण्यास हतबल केले जात आहे. यामुळे रेल्वे प्रशासनाकडून नियमांचा भंग होत असून कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात घालण्यात येत आहे.

दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने कळमना येथे नवीन गार्ड आणि ड्रायव्हर लॉबी २९ जुलै २०२१ सुरू केली. इंजिन चालक, गार्डस् आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी येथे सुविधा सुरू करण्यात न आल्याने प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. आता कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. इंजिन चालक, गार्डस् आणि इतर कर्मचाऱ्यांना या लॉबीत जाऊन कर्तव्यावर रुजू होण्यासाठी अनेक रुळांना ओलांडून जावे लागते. एसएसआय बिल्डिंगजवळ १३ रुळ आहेत आणि हजेरी लावण्यासाठी रुळ क्रमांक एकवर जावे लागते. बऱ्याचदा रुळावर रेल्वेगाडय़ा उभ्या असतात. अशावेळी इंजिन चालक, गार्डसना हजेरीसाठी धोका पत्करावा लागतो. रेल्वे रुळ क्रमांक १ ते सहापर्यंत पादचारी मार्ग (एफओबी) आहे. परंतु रेल्वे रुळ क्रमांक ६ ते १३ पर्यंत काहीच मार्ग नाही.

गार्डस् आणि चालकांना कर्तव्यावर रुजू होण्यासाठी हजेरीपटावर स्वाक्षरी करावी लागते. यासाठी जी जागा देण्यात आली. ती केवळ १० बाय १५ चे चेंबर आहे. ही जागा पुरेशी नाही. येथे केवळ सहा जणांच्या बसण्याची व्यवस्था आहे. एकाच वेळी पाच कर्मचाऱ्यांची बुकिंग असल्यास उर्वरित इंजिन चालक बाहेर उभे राहतात. तर गार्डसची समस्या आणखी तीव्र आहे. त्यांना चेंबर देण्यात आलेले नाही. त्यांची काहीच व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यांना बाहेर उभे राहून साईन ऑल, साईन ऑफ करावे लागते. त्यांच्यासाठी बसण्याची व्यवस्था नाही. त्यांच्या बॅग ठेवण्यासाठी रॅकही नाहीत. बाहेर दोन लोखंडी खुच्र्या ठेवण्यात आल्या आहेत. त्यावर गार्ड आणि इंजिन चालक बॅग ठेवतात. कर्तव्यावर रुजू होण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना मोकळय़ा जागेत उभे राहावे लागते. हिवाळय़ाचे दिवस आहेत. गार्ड रात्री ८ ते सकाळी ६ वाजेपर्यंत कर्तव्यावर असतो. त्याला छत नसलेल्या ठिकाणी थंडीत प्रतीक्षा करावी लागते.

अजून करोना पूर्णपणे संपलेला नाही आणि थंडीचा हंगामही सुरू झाला आहे. सर्दी, पडसे, ताप ही लक्षणे करोनाची आहेत. त्याचा संसर्ग कर्मचारी, इंजिन चालक, गार्ड यांना होऊ शकतो. त्याचा परिणाम रेल्वेच्या संचालनावर होऊ शकतो. त्यामुळे लवकरात लवकर कळमना येथे इंजिन चालक, गार्ड लॉबीसाठी छत उभारण्यात यावे. तसेच लॉबीत पुरेशा प्रमाणात खुच्र्या उपलब्ध करण्यात याव्यात.

कळमना लोको पायलट / गार्ड लॉबीत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था लॉबी सुरू झाल्यानंतरी दोन-तीन महिन्यांनी करण्यात आली. तेथेही कूपनिलकेचे पाणी पिण्यासाठी देण्यात येत आहे. तेथील फिल्टर योग्य नाही. त्याच्या टाकीची स्वच्छता होत नाही. त्यामुळे गार्डस आणि इंजिन चालक घरून पाण्याचे ओझे घेऊन येतात. रेल्वे कॉलनीतून जलवाहिनी टाकून पिण्याचा पाणीपुरवठा केला जाऊ शकतो.

येथे वाहनतळ आहे तो एस अँड टी विभागासाठी तसेच स्टेशन स्टॉफसाठी आहे. परंतु कळमना लॉबी असल्याने २०० नवीन कर्मचाऱ्यांची वाहने वाढली. त्यांच्यासाठी मात्र वाहनतळ देण्यात आलेले नाही. शिवाय रात्रीच्या वेळेस हा संपूर्ण परिसर सामसूम असते. येथे रात्रीच्या वेळेस पोलीस गस्त लावण्यात यावी, असे इंजिन चालक आणि गार्डस् यांनी रेल्वे प्रशासनाच्या लक्षात आणून दिले.

कळमना गार्डस् व ड्रायव्हर लॉबीत पुरेशा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. कर्मचाऱ्यांचा जीव विनाकारण धोक्यात घालण्यात येऊ नये.

विकास गौर, सचिव, स्वतंत्र रेल्वे बहुजन कर्मचारी युनियन.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Railway employees break rules ysh
First published on: 08-12-2021 at 00:52 IST