भंडारा : मुंबई-हावडा मार्गाच्या रेल्वे ट्रॅकने तुमसर रोड जंक्शनकडे जाणाऱ्या मालगाडीचे कपलिंग तुटल्याने इंजिनपासून नऊ डबे वेगळे झाले. चालकाच्या ते लक्षात न आल्याने इंजिन सुसाट समोर निघाले. मात्र गती कमी झाल्याने मागील भागात असलेल्या गार्डला ही बाब लक्षात येताच वॉकीटॉकीवर इंजिनचालकांशी संपर्क साधून माहिती दिली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. यामुळे मुंबई-हावडा मार्गाच्या डाऊनट्रॅकवर एक तास रेल्वे वाहतूक खोळंबली. यामुळे रेल्वे प्रशासनात एकच खळबळ माजली होती.

मुंबई-हावडा रेल्वेमार्गावर २४ तासांत सुमारे १२० मालगाड्या धावत असल्याने हा लोहमार्ग अतिशय व्यस्त आहे. तुमसररोड रेल्वे जंक्शनवरून डाऊन मार्गावर मालगाडी सुसाट निघाली. रेल्वे फाटक क्रमांक ५३२ जवळ कपलिंग तुटल्याने इंजिन व त्यामागील सुमारे दहा ते पंधरा डबे घेऊन रेल्वे इंजिन सुसाट पुढे निघाले. परंतु कपलिंग तुटल्याने मालगाडीचे नऊ डबे मागे राहिले. गाडीची गती कमी का झाली म्हणून मागे असलेल्या गार्डने डोकावून बघितले असता रेल्वे इंजिन मालगाडीचे काही डबे घेऊन सुसाट धावताना दिसले.

हेही वाचा – चंद्रपूर जिल्ह्याच्या विभाजनाच्या मागणीला पुन्हा जोर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गार्डने तात्काळ इंजिन चालकाशी संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितल्याने चालकाने तात्काळ गाडी थांबविली. या प्रकारामुळे डाऊन मार्गावर सुमारे एक तास रेल्वेची वाहतूक ‘खोळंबली होती. त्यानंतर तांत्रिक अडचण दूर करून मालगाडी पुढे सोडण्यात आली. वॉकीटाकीच्या संपर्क क्षेत्राच्या बाहेर रेल्वे इंजिन गेले असते तर मोठा अनर्थ घडला असता. त्यामुळे घडलेल्या प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्याचे समजते.