परीक्षेतील अनियमितता कारणीभूत

नागपूर : मध्य रेल्वेच्या मुंबई आणि नागपूर विभागात कनिष्ठ अभियंता म्हणून पदोन्नती देण्यासाठी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेत अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न विचारण्यात आले. तसेच अनेक प्रश्नांना हिंदी आणि इंग्रजीचा पर्यायच देण्यात आला नाही. त्याचा फटका कनिष्ठ अभियंता बनण्याचे स्वप्न बघणाऱ्या ट्रॅकमॅनला बसला आहे.

कनिष्ठ अभियंता बनण्यासाठी विभागीय परीक्षा १८ नोव्हेंबर २०२१ला घेण्यात आली. या परीक्षेत अनियमितता झाल्याची तक्रार परीक्षार्थी कर्मचाऱ्यांनी रेल्वेच्या दक्षता विभागाकडे केली. याशिवाय रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लक्षात ही बाब आणून देण्यात आली. पण रेल्वे प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने कर्मचाऱ्यांनी १५ डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम दिला नाही. त्यानंतर मुंबई आणि नागपूर येथे निदर्शने केली जातील, असे सेंट्रल रेल्वे ट्रॅकमेंटनर युनियनचे सरचिटणीस रामनरेश पासवान म्हणाले.

या परीक्षेत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या उमेदवारांवर अन्याय झाला आहे. रेल्वेतर्फे एससी, एसटी कर्मचाऱ्यांना परीक्षेआधी एक महिन्याचे र्कोंचग दिले जाते. यामध्ये ठराविक अभ्यासक्रम शिकवण्यात येते. परंतु परीक्षेत या अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न विचारण्यात आले. एवढेच नव्हेतर हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेत प्रश्नपत्रिका असणे आवश्यक असताना काही प्रश्न केवळ इंग्रजी भाषेत होते. काही प्रश्नांचे हिंदी भाषांतर दुसऱ्या पानावर होते. जेव्हा की इंग्रजी पाठोपाठ हिंदी असा पर्याय हवा. नागपूर विभागात तर गंभीर आरोप आहेत. उमेदवार परीक्षा केंद्रावर पोहचले, तेव्हा प्रश्नपत्रिका असलेला लिफाफा फोडला असल्याचे दिसून आले. परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमरे लावण्यात आले नव्हते, अशा तक्रारी आहेत. मुंबई विभागाने कनिष्ठ अभियंत्याची १२ पदे रिक्त असल्याची अधिसूचना काढली. परंतु गुणवत्ता यादी प्रकाशित करण्यात आली, तेव्हा ३९ उमेदवारांची निवड करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या बाबीला देखील रेल्वे कर्मचाऱ्यांनी कॅटमध्ये आक्षेप घेतला आहे.

आपल्या मर्जीतील कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळावी म्हणून लेखी परीक्षेत घोळ घालण्यात आला. याशिवाय विभाग प्रमुखांना कर्मचाऱ्यांच्या कागिरीवर गुण देण्याचे अधिकार असणे हे देखील गैरव्यवहाराला चालना देते. हे प्रकरण कॅटमध्ये दाखल करण्यात आले आहे. तसेच एससी, एसटी आयोगाकडे तक्रार करण्यात येणार आहे.

– रामनरेश पासवान, सरचिटणीस, सेंट्रल रेल्वे ट्रॅकमेंटनर युनियन

रेल्वेच्या विभागीय परीक्षा नेहमी होत असतात. या परीक्षांबाबत आक्षेप येत असतात. त्याचा निपटारा आम्ही आमच्या पद्धतीने करीत असतो.

– एन.एस. काझी, वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी