अकोला : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने तळ ठोकला आहे. शहरासह जिल्ह्यातील विविध भागात बुधवारी सायंकाळच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सर्वत्र जलमय वातावरण झाले. जिल्ह्यात दमदार पाऊस कोसळल्यामुळे खरीप हंगामातील पेरणीच्या कार्याला वेग आला आहे.
जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून ढगाळ पावसाळी वातावरण तयार झाले. शहरात उन्ह व पावसाचा खेळ सुरू असतो. मंगळवारी सायंकाळी दमदार पाऊस कोसळला होता. त्यानंतर बुधवारी दुपारपर्यंत पावसाने उसंत घेतली. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास शहरातील विविध भागांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सुमारे अर्धा तास पाऊस पडला. या पावसामुळे सखल भागामध्ये पाणी साचले आहे.
विविध भागातील वीज पुरवठा देखील पावसामुळे खंडित झाला होता. महावितरणने तो सुरळीत केला. जिल्ह्यात गेल्या ४८ तासांमध्ये ८७.८ मि.मी. पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस अकोट तालुक्यात पडला. दमदार पावसामुळे बळीराजा पेरणीच्या कार्यात व्यस्त झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी २८ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत.
सिंचन प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून दमदार पावसाने हजेरी लावल्यामुळे सिंचन प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ झाली आहे. २५ जून रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत काटेपूर्णा प्रकल्पातील पातळी ३३९.८७ मीटर १२.५८ टक्के पाणी साठा आहे. सिंचन प्रकल्पाच्या क्षेत्रात एकूण १५ मि.मी. पाऊस झाला. तेल्हारा तालुक्यातील वान प्रकल्पात पातळी ३९६.३७ मीटर असून जलसाठा ३५.४६ टक्के आहे. परिसरात एकूण १०० मि.मी. पाऊस झाला. मोर्णा प्रकल्पात पाण्याची पातळी ३६०.७५ मि.मी. आहे. ३१.१४ टक्के धरण भरले असून आतापर्यंत ३९ मि.मी. पावसाची नोंद झाली. निर्गुणा प्रकल्पातील पाणी पातळी ३८१.५० मीटर आहे. हे धरण ७.७३ टक्के भरले. उमा प्रकल्पात ३३७.४० मीटर, तर दगडपारवा प्रकल्पात ३१४.६० मीटर पाण्यासह २३.१५ टक्के जलसाठा आहे.
२९ जूनपर्यंत सतर्कतेचा इशारा
नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्रातर्फे जिल्ह्यांमध्ये २९ जूनपर्यंत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या कालावधीत वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० किमी प्रतितास राहील. वीज, वारा व पावसापासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. झाडाखाली आसरा घेऊ नये. या काळात ड्रेनेज, सखल भाग, रस्त्याचे अंडरपास किंवा जिथे पाणी साठते, अशा ठिकाणी जाणे टाळावे. पूर आलेल्या रस्त्यावरून चालू नये. जनावरांना झाडांना किंवा विजेच्या तारेला, खांबाला बांधू नये आदी दक्षतेबाबत सूचना जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत.