मेडिकलच्या कर्मचाऱ्यांवर संशय

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) येथे राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेतील रुग्णांना उपचारानंतर घरी परतण्याकरिता दिला जाणाऱ्या प्रवास भत्त्यावर कर्मचारी-अधिकारी डल्ला मारत असल्याची बाब उघड झाली आहे. रुग्णांना ही रक्कम दिल्यावर संबंधित यंत्रणेकडून छायाचित्र काढताच रक्कम परत घेतली जाते. एका नातेवाईकाच्या तक्रारीवरून हा प्रकार पुढे आला असून जिल्हाधिकाऱ्यांसह अनेकांकडे तक्रारी केल्यावरही त्याकडे सगळे दुर्लक्ष करण्यात आले आहे.

योजनेचे यश व लाभार्थ्यांची संख्या बघता मेडिकलच्या कर्मचाऱ्यांनी नियमबाह्य़ पैसे कमवण्याकरिता नवीन क्लृप्ती सुरू केली आहे. या योजनेंतर्गत संबंधित रुग्णाला उपचारानंतर रुग्णालयातून सुट्टी झाल्यावर घरी परत जाण्याकरिता तो राहत असलेल्या गाव वा शहरातील अंतरानुसार विशिष्ट रक्कम प्रवास भत्त्याच्या स्वरूपात रोख दिली जाते. रुग्णाला रक्कम दिल्याचे छायाचित्र काढून संबंधित कर्मचाऱ्याला ते योजनेच्या सिस्टममध्ये अपलोड करावे लागते. मात्र, कर्मचारी रुग्णांना पैसे देतात, त्याचे छायाचित्रही काढले जाते, पण नंतर ही रक्कम रुग्णाकडून परत घेतली जाते. कुणी आक्षेप घेतल्यास आमच्याकडे छायाचित्र पुरावा असून तुम्ही रक्कम मिळाली नाही, असे स्पष्ट करू शकत नसल्याचे सांगत नातेवाईकांना हुसकावून लावले जाते.

गरिबांसाठी वरदान योजना

शासनाची राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना ही गरिबांकरिता वरदान ठरली आहे. या योजनेतून ९७१ आजारांवर मोफत उपचार व शस्त्रक्रिया केल्या जातात. नागपूर जिल्ह्य़ात ४ वैद्यकीय महाविद्यालये, २४ मल्टी स्पेशालिटी रुग्णालये, ११ सिंगल स्पेशालिटी रुग्णालये, ३१ खासगी रुग्णालये या योजनेंतर्गत नोंदणीकृत आहे. येथे आतापर्यंत ६३ हजाराहून जास्त रुग्णांवर शस्त्रक्रिया झाल्या आहेत. पैकी ५३ हजारावर दावे विमा कंपनीने मंजूर करत रुग्णालयांना ११२ कोटी ८३ लाख रुपये वितरितही केले आहे. मार्च-२०१७ मध्येही या रुग्णालयांत १,५६६ शस्त्रक्रिया होऊन विमा कंपनीकडून १,०६५ दावे मंजूर करून ३ कोटी २९ लाख रुपये वितरित करण्यात आले.

औषधांचे बिल देण्यासही टाळाटाळ

या योजनेंतर्गत रुग्णाने औषध बाहेरून आणल्यास त्यांना ही बिले कालांतराने मेडिकल प्रशासनाकडून अदा केली जातात, परंतु मेडिकलमध्ये ही रक्कम देण्याकरिता लिपिक व डॉक्टर टाळाटाळ करतात. एका कर्करुग्णासोबत हा प्रसंग घडला आहे. त्यातच या रुग्णांना प्रवास भत्त्याची रक्कम दिल्याचे छायाचित्र काढताच हे कर्मचारी रक्कम परत घेतात. ही तक्रार जिल्हाधिकाऱ्यांसह अनेकांना केल्यावरही कारवाई केली जात नसल्याचे आढळून आले आहे.

अविनाश गडेकर, तक्रारकर्ता

राज्यात राजीव गांधी जीवनदायी योजनेचे काम नागपूरच्या मेडिकलमध्ये सगळ्यात चांगले असून सर्वाधिक शस्त्रक्रिया येथे झाल्या आहेत. येथील कर्मचाऱ्यांसह डॉक्टरांच्या बाबतीत तक्रार असल्यास तातडीने चौकशी केली जाईल. कोणत्याही रुग्णांवर अन्याय होऊ देणार नाही.

डॉ. अभिमन्यू निसवाडे, अधिष्ठाता, मेडिकल, नागपूर