चंद्रपूर: राजुरा मतदार संघातील बोगस मतदार नोंदणी प्रकरणात शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या बोगस मतनोंदणी प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला तातडीने अटक करावी अशी मागणी केली आहे. तसेच या बोगस मतदार नोंदणी प्रकरणात पोलीस एफआयआरमधील दोन मोबाईल क्रमांक भाजप पदाधिकाऱ्यांशी थेट संबंधित आहे. भाजपाचे थेट कनेक्शेन दिसत असतांना पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी बोलविले नाही, त्यांचा जबाब नोंदविला नाही किंवा अटक केली असा थेट आरोप केला आहे.

विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी यांनी मतचोरी व बोगस मतदार नोंदणी प्रकरणात राजुरा मतदार संघाचा उल्लेख केल्यापासून राजुरा विधानसभा सातत्याने चर्चेत आहे. आता तर शेतकरी संघटनेचे पराभुत उमेदवार माजी आमदार ॲड.वामनराव चटप, ॲड. दिपक चटप यांनी बोगस मत नोंदणी प्रकरणात भाजपाचे थेट कनेक्शन दिसून येत आहे असा आरोप केला आहे. राजुरा विधानसभा मतदार संघातील यादीतील ६ हजार ८५३ बोगस मतदार नोंदणी प्रकरणात १९ ऑक्टोंबर २०२४ रोजी गुन्हा दाखल झाला आहे.

ठोस पुरावे असूनही पोलिस प्रशासन निष्क्रिय आहे. या एफआयआर मध्ये स्पष्ट नावे व मोबाईल क्रमांक नमूद आहेत, तरीही १२ महिने उलटून गेले तरी जबाब नोंद, अटक किंवा कसलीही चौकशी झालेली नाही. विशेष म्हणजे, १५ व्या क्रमांकावरचा मोबाईल नंबर ७८२०८६४५१९ हा अनिल झाडे यांचा आहे, जे भाजप गडचांदूर नेते निलेश ताजणे यांच्या मेडिकलशी संबंधित आहेत. तसेच १६ व्या क्रमांकावरचा मोबाईल नंबर ९६०७२१७१४३ हा प्रतीक सदानपवार यांचा आहे, जे गडचांदूरचे भाजप कार्यकर्ते आहेत व ज्यांचे भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार व विद्यमान आमदार देवराव भोंगले यांच्या सोबतचे छायाचित्र उपलब्ध आहेत. हे दोन्ही नंबर एफआयआर मध्ये स्पष्ट नमूद असूनही, अजूनपर्यंत त्यांना अटक करून चौकशी का झालेली नाही, हा गंभीर प्रश्न आहे. तसेच गंगाधर, बंडू व क्रीश लिहिलेले नाव व नंबर हे बाखर्डी परिसरातील असून ते देखील बीजेपी संबंधित आहेत.

ही घटना ही लोकशाही प्रक्रियेचा गळा घोटण्याचा कट असून मतदार याद्यांमध्ये खोट्या नोंदी घालून निवडणुकीवर परिणाम करण्याचा थेट प्रयत्न आहे. मात्र पोलिस प्रशासनाने निष्क्रियता दाखवत जबाबदारी निवडणूक आयोगाकडे ढकलली आहे. हे जनतेच्या विश्वासाशी केलेले थेट धोकेबाज कृत्य आहे. माजी आमदार अॅड. वामनराव चटप यांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या पत्राद्वारे ठाम मागणी केली आहे की, या आरोपींना तातडीने अटक करून चौकशी करण्यात यावी, तसेच या बोगस मतनोंदणीतील मुख्य सूत्रधार समोर आणावा आणि कारवाईचा अहवाल सार्वजनिक करावा. यासंदर्भात ज्येष्ठ नेते अॅड. मुरलीधर देवाळकर, शेतकरी संघटना युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष अॅड. दीपक चटप, स्वभाप जिल्हाध्यक्ष निळकंठ कोरांगे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष पोर्णिमा निरंजने आदींनीही आंदोलनाचा इशारा दिला आहे.