अमरावती : वरूड तालुक्‍यातील राजुरा येथील मिरची बाजारात लगबग वाढली आहे. विदर्भात रात्रीतून चालणारी ही एकमेव बाजारपेठ असून सायंकाळी ७ वाजेपासून सुरू होणारा बाजार मध्‍यरात्रीनंतरही सुरू असतो. एका रात्रीत या बाजारपेठेत हिरव्‍या मिरचीची कोट्यवधींची उलाढाल होते.येथील हिरव्‍या मिरचीला परदेशातूनही मागणी असल्‍याने या बाजाराची ख्‍याती वाढली आहे. बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या हिरव्या मिरचीची ओळख घाटावरची तिखट मिरची अशी आहे. ही मिरची अतिशय तिखट असल्याने तिला मोठ्या प्रमाणात मागणी असते. मिरची खरेदीसाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून व्यापारी येथे डेरेदाखल होतात.रविवारी सुमारे ३०० क्विंटल मिरचीची आवक झाली आणि ३ हजार ५०० ते ३ हजार ६०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. आवक वाढताच दर थोडे कमी झाले आहेत. १० सप्‍टेंबर रोजी १९९ क्विंटल हिरव्‍या मिरचीची आवक झाली होती आणि ४ हजार रुपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला होता.

वरूड कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीचा उपबाजार असलेल्‍या राजुरा बाजार येथील या बाजारपेठेला राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव देण्‍यात आले आहे. या बाजारपेठेत वरूड, मोर्शीसह परतवाडा, चांदूर बाजार, आर्वी, आष्‍टी, काटोल, नरखेड, जलालखेडा, मध्‍यप्रदेशातील मुलताई, पांढुर्णा या परिसरातील शेतकरी मिरची विकण्‍यासाठी येतात.या बाजारात परवानाधारक १८९ व्‍यापारी, ५६ अडते, दोन मापारी आणि ९३ हमाल कार्यरत आहेत. हजारो मजुरांच्‍या हाताला काम देणारी ही बाजारपेठ आहे.

हेही वाचा >>>‘एसटी’ कर्मचारी वेतनवाढ श्रेयाच्या लढाईत कर्मचाऱ्यांची फरफट; महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस म्हणते…

राजुरा येथील मिरची बाजारातून कोलकाता, मुंबई, दिल्‍ली, या मोठ्या शहरांसह राजस्‍थान, गुजरात, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा, मध्‍यप्रदेश, छत्‍तीसगड, पंजाब, उत्‍तरप्रदेश, पश्चिम बंगालसह देशाच्‍या कानाकोपऱ्यात येथील मिरची पोहचते. यासोबतच पाकिस्‍तान, बांगलादेश, आणि आखाती देशांमध्‍ये येथील मिरची प्रसिद्ध असल्‍याने व्‍यापारी मिरचीची निर्यात करतात. मालाच्‍या खरेदीनंतर शेतकऱ्यांना हातोहात रोख रक्‍कम देण्‍याची पद्धत या ठिकाणी आहे.

हेही वाचा >>>मिठाई, जाम, जेली, कँडीसाठी वापरले जाणारे ‘जिलेटीन’ आता बॉयलर कोंबडीच्या वेस्टपासून बनणार…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेतकरी गोण्‍यांमधून मिरच्‍या आणतात आणि मालाची प्रत पाहून दर ठरविले जातात. हिरव्‍या मिरचीचा हंगाम सहा महिन्‍यांचा असतो. ऑगस्‍ट ते मार्च असा त्‍याचा कालावधी आहे. गेल्‍या पंधरा दिवसांपासून बाजारात लगबग वाढली आहे. यंदा मिरचीचा भाव चांगला आहे. मात्र ती वेळेते पोहचविणे जिकरीचे काम आहे. रेल्‍वेने प्राधान्‍यक्रम देऊन वाहतूक झाल्‍यास राजुरा बाजारपेठेचा विकास होऊ शकतो, असे मिरची व्‍यापारी दिलीपराव भोंडे यांनी सांगितले.