चंद्रपूर : विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी ‘मतचोरी’चा आरोप केल्यामुळे देशभर चर्चेत आलेल्या राजुरा मतदारसंघातील राजुरा नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस आणि शेतकरी संघटनेत युतीसंदर्भात प्राथमिक चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. नगराध्यक्षपद काँग्रेसच्या, तर नगरसेवकपदाच्या जास्त जागा शेतकरी संघटनेकडे जाण्याची चिन्हे आहे. मात्र, ही निवडणूक काँग्रेसने ‘पंजा’ बोधचिन्हावर न लढता अन्य चिन्हावर लढावी, अशी अट संघटनेने ठेवल्याची माहिती आहे.

राजुरा नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस, भाजप आणि शेतकरी संघटना, हे तीन प्रमुख पक्ष आहेत. येथे भाजपचे देवराव भोंगळे आमदार असले तरी काँग्रेस व शेतकरी संघटनेचीही ताकद आहे. मतचोरीच्या मुद्यावरून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे व संघटनेचे ॲड. वामनराव चटप यांचे एकमत आहे.

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत राजुरा पालिका क्षेत्रात चटप यांना लक्षणीय मते मिळाली होती. आता पालिका निवडणुकीत या मतांच्या आधारावर शेतकरी संघटना जय-पराजयाचे गणित बिघडवू शकते. त्यामुळे काँग्रेस आणि शेतकरी संघटनेने एकत्र येण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. ‘शहर विकास आघाडी’ या नावाखाली शेतकरी संघटना आणि काँग्रेस निवडणुकीला सामोरे जाऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धोटे यांचे बंधू अरुण धोटे नगराध्यक्षपदाचे प्रमुख दावेदार आहेत. मात्र, काँग्रेसने ‘पंजा’ चिन्हावर लढू नये, असा प्रस्ताव शेतकरी संघटनेचा आहे. जिल्हाध्यक्षांच्या गृह शहरात ‘पंजा’ गोठवणे पक्षासाठी धोकादायक ठरू शकते. या निर्णयाचा फटका जिल्ह्यातील इतर नगरपालिकांमध्ये बसू शकतो, अशी भीती काँग्रेस नेत्यांना आहे. मात्र, भाजपचा पराभव करण्यासाठी काँग्रेस व शेतकरी संघटना एकत्र येण्याच्या तयारीत आहेत. हे दोन्ही पक्ष एकत्र आल्यास भाजपची चांगलीच अडचण होण्याची शक्यता आहे.

काँग्रेसशी चर्चा झाल्यानंतरच शहर विकास आघाडी कोणत्या चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणात उतरेल, हे सांगता येईल.- ॲड. वामनराव चटप, शेतकरी संघटना

दोन्ही पक्षांतील दुसऱ्या फळीतील नेत्यांमध्ये युतीची चर्चा झाली आहे. चिन्हाची अडचण आल्यास पक्षनेत्यांची परवानगी घेऊन योग्य निर्णय घेतला जाईल.- सुभाष धोटे, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस.