अमरावती : बहीण-भावाच्या प्रेम आणि आपुलकीचे प्रतीक असलेला रक्षाबंधनचा सण आज साजरा करण्यात येत आहे. श्रावण महिन्यात राखी पौर्णिमेच्या दिवशी बहीण भावाला राखी बांधते आणि भाऊ बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो. भारतीय लोक जगभरात पोहोचले आहेत. त्यामुळे जगाच्या विविध भागात भारतीय सण साजरे होतात. मेळघाटात बांबूपासून तयार होणाऱ्या राख्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून स्वतंत्र ओळख निर्माण केली असून या राख्या आता थेट विदेशातही पोहोचल्या आहेत. यंदा अमेरिका, जर्मनी, आयर्लंड इत्यादी देशांमध्ये या राख्या पाठवण्यात आल्या. आतापर्यंत ६० देशांमध्ये या राख्या पोहोचल्या आहेत.

दिवंगत सामाजिक कार्यकर्ते सुनील देशपांडे यांनी सुमारे तीस वर्षांपुर्वी संपूर्ण बांबू केंद्राची स्थापना केली. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी निरूपमा देशपांडे हे कार्य सांभाळत आहेत.

मेळघाटातील अनेक गावांमधील आदिवासी महिला राख्या बनविण्याचे काम करतात. आता त्यांना बाराही महिने राख्या बनविण्याचे काम दिले जात आहे. त्यात त्यांना चांगला रोजगार मिळत आहे. लोकांना प्रतिसाद पाहता शाळकरी मुलांसाठी राखी बनविण्याची किट तयार करण्यात आली आहे. त्यांनाही राखी बनविणे शिकवले जात आहे.

बांबूच्या राखीचे वैशिष्ट्य काय?

मेळघाटच्या जंगलात मोठ्या प्रमाणात असणाऱ्या बांबूपासून या राख्या तयार होतात. बांबूमधून अतिशय बारीक धाग्यासारखे काप बाहेर काढून त्यावर कलाकुसर करून विविध आकारातील राख्या तयार केल्या जातात.

बांबूपासून तयार होणाऱ्या विविध वस्तूंना चांगली मागणी असल्याने मेळघाटातील आदिवासी लोकांना चांगला रोजगार उपलब्ध झाला. राखी बनविण्याच्या उद्योगात यावर्षी एकूण ६८ जण सहभागी झाले होते. तीन महिन्यांपासून राखी बनविण्याचे काम सुरू झाले होते. आज अमेरिका, आयर्लंड आणि जर्मनी या देशात आम्ही तयार केलेल्या राखी पोहोचल्या आहेत. या राख्यांची ऑर्डर बऱ्याच आधी मिळाली होती. त्यामुळे मागील अडीच महिने या राख्या तयार करण्याचे काम याठिकाणी सुरू होते, अशी माहिती निरूपमा देशपांडे यांनी दिली.

मेळघाटातील आदिवासी महिलांनी तयार केलेली राखी २०१८ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातावर बांधण्यात आली होती. खास रक्षाबंधनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनगटावर राखी बांधायला माझ्यासह पाच आदिवासी महिला दिल्लीला गेलो होतो. तो क्षण आमच्यासाठी अतिशय आनंदाचा आणि महत्त्वाचा ठरला होता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दरवर्षी आम्ही बांबूची राखी बांधतो, असे देखील निरुपमा देशपांडे यांनी सांगितले.