नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाला माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. उद्या २ ऑक्टोबर रोजी संघाचा विजयादशमी उत्सव रेशीमबाग मैदानावर होणार आहे. त्या उत्सवापासून २०२६ च्या विजयादशमी उत्सवापर्यंत संघाचे शताब्दी वर्षानिमित्त संपूर्ण देशभरात विविध कार्यक्रम होणार आहेत. या पार्श्वभूमीवर यंदाचा उत्सव संघाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. मुख्य म्हणजे आजवरचा इतिहास पाहता विजयादशमी उत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणारे रामनाथ कोविंद हे पहिलेच माजी राष्ट्रपती आहेत.

बुधवारी सायंकाळी त्यांचे नागपूर मध्ये आगमन झाले असून त्यानंतर रामनाथ कोविंद यांनी संघाचे पहिले सरसंचालक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांच्या महाल परिसरातील घराला भेट दिली. या ऐतिहासिक वास्तूचे दर्शन घेत त्यांनी येथे असलेल्या झोपाळ्यावरही बसण्याचा आनंद घेतला.संघाच्या रचनेमध्ये विजयादशमी उत्सवाला महत्त्वाचे स्थान आहे. या दिवशी रेशीमबागहून सरसंघचालक काय बोलतात याकडे संपूर्ण जगाचे लक्ष असते. गेल्या काही वर्षांमध्ये सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या भाषणातून अनेक ज्वलंत मुद्यांना हात घातला आहे. संघाचे शताब्दी वर्ष पाहता सरसंघचालक भागवत कोणत्या मुद्यांना स्पर्श करणार याबाबत उत्सुकता आहे.

संघाने शताब्दी पंच परिवर्तनावर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये ‘स्व’बोध, पर्यावरण, सामाजिक समरसता, नागरिक शिष्टाचार, कुटुंब प्रबोधन यांचा समावेश आहे. वर्षभर या पाच मुद्यांवर प्रबोधनपर कार्यक्रम होणार आहेत. संघाचे तृतीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी दिलेल्या सामाजिक समरसतेचा संदेश समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचविण्यावर शताब्दी वर्षात विशेष भर राहणार आहे. यासाठी खंडस्तरावर सामाजिक सद्भाव बैठका होणार आहेत. संघ हा काही विशिष्ट जातींपुरता मर्यादित असल्याची टीका वारंवार झाली आहे.

त्याला प्रत्युत्तर म्हणून संघ सर्वसमावेशक तसेच सामाजिक समरसता मानणारा असल्याचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून देण्यात येत आहे. त्याच श्रृंखलेत आता सामाजिक सद्भाव बैठका घेऊन समरसतेचा संदेश सर्वांपर्यंत पोहचविण्यात येणार आहे. अशात दलित समाजातून येणाऱ्या माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना प्रमुख पाहुणे या नात्याने बोलावून प्रत्यक्ष कृतीतून संघाने समरसतेचा संदेश दिल्याची चर्चा आहे.

कोविंद यांच्याबद्दल…

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे ७९ वर्षांचे असून भारताचे १४ वे राष्ट्रपती होते. त्यांनी २५ जुलै २०१७ ते २५ जुलै २०२२ या कालावधीत राष्ट्रपतीपदाची जबाबदारी पार पाडली. निवृत्तीनंतर कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली आठ सदस्यीय उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीने भारतातील एकाचवेळी निवडणुका (वन नेशन, वन इलेक्शन) घेण्याबाबतचा अहवाल सादर केला होता. दलित नेते असलेले कोविंद हे उत्तर प्रदेशातून राष्ट्रपतीपदी विराजमान होणारे एकमेव व्यक्ती ठरले होते.