नागपूर : आरटीओ कार्यालयांतील भ्रष्टाचाराचे तार परिवहन खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी जुळले असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सातत्याने भाषणात सांगतात. या पद्धतीचेच एक प्रकरण रामटेक परिसरात उघडकीस येण्याचे संकेत आहे. येथे प्रशांत जाधव या आरोपीवर रामटेक पोलिसांनी आरटीओ अधिकाऱ्याला ठार मारण्याची धमकी, जातिवाचक शिवीगाळसह इतर प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर आरोपी पसार झाला आहे. हा अधिकारी सापडल्यास काही परिवहन खात्यातील अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता आहे.

तक्रारदार मंगेश राठोड हा नागपूर शहर आरटीओ कार्यालयात मोटार वाहन निरीक्षक पदावर कार्यरत आहे. तर आरोपी प्रशांत जाधव याच्यावर आरोप आहे की, तो परिवहन आयुक्त कार्यालयातील मोठ्या अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून तपासणी नाक्यावरील निवडक अधिकाऱ्यांना अडकावण्याचा प्रयत्न करत होता. त्यानंतर संबंधिताकडून वसुलीही केली जायची. परिवहन खात्यात दोन गटातील वादातूनच हा प्रकार घडत असल्याचे संकेत आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ३१ जुलैला सकाळी ८.२१ वाजता राठोड हे कांद्री तपासणी नाक्यावर कर्तव्यावर होते. यावेळी आरोपी प्रशांत जाधव आपल्या सहकाऱ्यासह पांढऱ्या कारमधून तेथे गेला. तो विना परवानगी तेथे भ्रमणध्वनीवर चलचित्र टिपायला लागला.

प्रशांतने आरटीओ अधिकारी राठोड यांना त्याचे ट्रक तपासणीशिवाय पुढे जाऊ देण्याची धमकी दिली. राठोड याने नकार दिल्यावर जाधवने जातिवाचक अपशब्दांचा वापर केला. जेव्हा राठोड यांनी त्याच्या मागण्या मान्य करण्यास नकार दिला, तेव्हा जाधव आक्रमक झाला आणि चेक पोस्टवर गोंधळ घातला. त्यामुळे सुमारे अर्ध्या तासापर्यंत शासकीय वाहनांची तपासणी थांबवावी लागली. यावेळी तेथे एक खासगी वाहनचालक विजय सोनटक्के व अदानी कंपनीचा एक कर्मचारी होता, राठोड यांच्या तक्रारीवरून रामटेक पोलिसांनी प्रशांत जाधवविरुद्ध गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच प्रशांत जाधव पसार झाला. तो पोलिसांच्या तावडीत सापडल्यास परिवहन खात्यातील मोठ्या अधिकाऱ्याचे नाव पुढे येऊन या प्रकरणातील बरीच धक्कादायक माहिती पुढे येण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. या विषयावर परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, प्रतिसाद मिळाला नाही.

परिवहन खात्यातील अधिकाऱ्यांशी तार

सूत्रांच्या माहितीनुसार, जाधव यापूर्वीही मालवाहतूक ट्रकच्या बेकायदेशीर हालचालींमध्ये सहभागी राहिला आहे. तो आरटीओ कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारीची धमकी देतो. गोंदिया व औरंगाबाद आरटीओ कार्यालयातही त्याने अशाच प्रकारे दबाव टाकल्याची सूत्रांची माहिती आहे. तो परिवहन आयुक्त कार्यालयाच्या १९९९ बॅचमधील काही अधिकाऱ्यांसाठी कार्य करत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.