गोंदिया : सप्टेंबर महिना ‘बिग बटरफ्लाय मन्थ’ म्हणून साजरा केला जातो. या महिन्याच्या निमित्ताने अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानातील फुलपाखरांच्या सर्वेक्षणात उद्यानाच्या जांभळी गेटजवळ दुर्मिळ मंकी पजल बटरफ्लाय (राथिंडा अमोर) प्रथमच येथील संशोधकांना सापडले.

जैवविविधता अभ्यासक व स्थानिक एस. एस. जायस्वाल महाविद्यालयाचे सहयोगी प्रा. डॉ. गोपाल पालीवाल, धाबेपवनीचे प्रा. भीमराव लाडे, प्रा. डॉ. सुधीर भांडारकर यांनी प्रथमच या दुर्मिळ फुलपाखराची माहिती दिली. यापूर्वी या फुलपाखराची नोंद भारतातील दक्षिण आणि पूर्वेकडील राज्ये केरळ, कर्नाटक, आंध्रप्रदेश, ओडिशा, तामिळनाडू, छत्तीसगड, गोवा, पश्चिम बंगाल, बिहार आणि महाराष्ट्रातही डॉ. टिपले व डॉ. भागवत यांनी याचवर्षी केली आहे.

हेही वाचा : तान्हा पोळ्याच्या दिवशी निघणारी पिवळी मारबत आजपासून दर्शनासाठी; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी करणार पूजा

नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भात कोरड्या मिश्र जंगलापासून पावसाच्या जंगलापर्यंतच्या वनस्पतींमधील विविधतेसाठी प्रसिद्ध आहे. हे दक्षिणेकडील उष्णकटीबंधीय जंगल वन्यजीवांनी समृद्ध आहे आणि मध्य भारतातील एक महत्त्वाचे संरक्षण घटक आहे. नवेगाव राष्ट्रीय उद्यानात विविध कुटुंबांतील सुमारे ७० प्रजातींची फुलपाखरे यापूर्वीच दिसली आहे. मंकी पजल बटरफ्लाय हे लाइकेनिड कुटुंबातील एक आकर्षक फुलपाखरू आहे. नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानाच्या जांभळी गेटजवळ इक्सोरा (जंगल जिरॅनियम) वनस्पतीवर ते दिसून आले.

हेही वाचा : सोयाबीन उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट होणार, पावसाचा खंड पडल्याचा परिणाम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या फुलपाखराचे सामान्य नाव त्याच्या पंखांखाली दिसणाऱ्या गुंतागुंतीच्या पॅटर्नमुळे किंवा त्याच्या विशिष्ट लॅण्डिंग पॅटर्नमुळे पडले असावे. स्थानिक संशोधकांच्या या यशाबद्दल एस.एस. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ईश्वर मोहर्ले, डॉ. अरुण झिंगरे, रूपेश निंबार्ते, छत्रपाल चौधरी, कुलदीपसिंह बाच्चिल, प्रवीण रणदिवे, विवेक बावनकुळे यांच्यासह निसर्गप्रेमींनी अभिनंदन केले आहे.