लोणार :  खाऱ्या पाण्याच्या सरोवरामुळे जगात विख्यात लोणार येथील दुर्गा टेकडी म्हणजे सरोवर नगरीतील पर्यटन स्थळ असून परिसरात दुर्मिळ वनस्पती, वृक्ष व जंगली प्राण्यांचे वास्तव्य आहे.दुर्गा टेकडी हा पर्यटक व स्थानिक नागरिकांसाठी आकर्षण असून एक  निसर्गरम्य परिसर आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर वनसंपदा तसेच विविध प्रजातींचे पक्षी व वन्यजीव आढळतात.वनस्पती अभ्यासकांचे आकर्षण असलेल्या  या प्रसिद्ध दुर्गा टेकडी परिसरात आज बुधवारी,१२ मार्च रोजी संध्याकाळी अचानक आग लागली.  संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले. पाहतापाहता ही आग पसरली. याची माहिती मिळताच  लोणार नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने  तातडीने घटनास्थळी धाव घेतली आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले. महसूल प्रशासन व स्थानिक नागरिकांनी तत्काळ अग्निशमन विभागाला माहिती दिल्यामुळे वेळीच आगीवर नियंत्रण मिळवता आले. यामुळे सुदैवाने प्राणहानी झाली नसली तरी दुर्मिळ वनस्पती, वृक्षाना आगीची झळ पोहचली आहे. वनसंपदा व पर्यावरणीय हानी  मोठ्या प्रमाणावर झाली आहे.

प्राथमिक अंदाजानुसार, तीव्र उन्हामुळे कोरडे गवत पेटल्याची शक्यता वर्तविली जात आहे. लोणार सह मेहकर नगरपालिकेच्या अग्निशमन दला lसह स्थानिक खासगी टँकरधारकांनी अथक परिश्रम घेतले. यामुळे आग नियंत्रणात आली.

प्रशासनाने या घटनेची सखोल चौकशी करून आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे.स्थानिक नागरिकांच्या मदतीने अग्निशमन विभागाने काही तासांतच आग आटोक्यात आणली.आगीची माहिती मिळताच माजी नगराध्यक्ष  बळीराम मापारी, तहसीलदार भूषण पाटील, मुख्याधिकारी विभा वऱ्हाडे, नायब तहसीलदार रामप्रसाद डोळे, मंडळ अधिकारी लक्ष्मण सानप, नगरपालिकेचे अभियंता अजय मापारी, संतोष जाधव, गजानन बाजड, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिकेत मापारी, तानाजी मापारी आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नगरपालिकेने तसेच वन विभागाने नागरिकांना परिसरात ज्वलनशील पदार्थ टाकू नयेत व आग लागण्यास कारणीभूत ठरणाऱ्या गोष्टी टाळाव्यात, असे आवाहन केले आहे.