अमरावती : बडनेराचे आमदार रवी राणा यांनी काँग्रेसच्या नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्या निवासस्थानी दिवाळीनिमित्त किराणा पिशवी पाठवल्यानंतर ठाकूर यांनी तीव्र संताप व्यक्त करीत राणांवर टीका केली. त्यावर राणा यांनी प्रत्यूत्तर दिले आहे.

आपण दरवर्षी यशोमती ठाकूर यांच्या निवासस्थानी दिवाळीच्या किराण्याची पिशवी पाठवतो. पण, यावर्षी अचानक त्यांनी आपण दिलेल्या भेटवस्तूंचा अनादर केला. त्यांनी आपल्यावर अनेक आरोप केले. इतरही नेत्यांना आपण किराणा, भेटवस्तू पाठवल्या, पण कुणीही अशा प्रकारची अहंकाराची भाषा वापरली नाही. त्यांच्या वक्तव्यात द्वेष दिसून येत आहे, अशी टीका रवी राणा यांनी केली आहे.

रवी राणा म्हणाले, यशोमती ठाकूर माझ्या मोठ्या बहिणीसारख्या आहेत. मी त्यांचे वक्तव्य ऐकले. मी पाठवलेल्या किराण्याचा त्यांनी कडाडून विरोध केला. पिशवीतील एकेक वस्तू त्यांनी काढून दाखवली. मी मोठ्या घरची मुलगी आहे, मी जमीनदार आहे, मी आर्थिकदृष्ट्या संपन्न आहे आणि मला या किराण्याची गरज नाही, असे त्यांनी सांगितले खरे, पण आम्ही जो किराणा घरी वापरतो, तोच नागरिकांना वाटप करीत असतो. अनेक वर्षांपासून किराणा भेट म्हणून देतो.

यशोमती ठाकूर यांच्या घरी देखील अनेक वर्षांपासून एक फराळाची किट आणि एक किराणाची किट पाठवली जाते. एका भावाकडून बहिणीला एक भेट म्हणून आपुलकीच्या भावनेतून या भेटवस्तू आपण पाठवतो. पण, त्याचा जो विरोध यशोमती ठाकूर यांनी केला, हे दुर्देवाचे आहे.

रवी राणा म्हणाले, यशोमती ठाकूर यांनी आपल्यावरही आरोप केले. मी गरिबीचे दिवस पाहिले आहेत. पण, आता माझ्याकडून जेवढे शक्य होईल, तेवढी भेट आपण देत असतो. या भेटवस्तू अनेक बहिणींनी स्वीकारल्या. लाखो बहिणींपर्यंत साड्या पोहचल्या. त्यांनी या साड्या परिधानही केल्या. ठाकूर यांनी माझा विरोध केला, त्याची चिंता आपण बाळगत नाही.

रवी राणा म्हणाले, केवळ आजच नाही, तर दरवर्षी मी दिवाळीनिमित्त फराळ आणि किराण्याची पिशवी यशोमती ठाकूर यांच्या घरी पाठवत असतो. पण, यावेळी अचानक त्यांनी जी भाषा वापरली, त्यातून त्यांचा अहंकारच दिसून आला आहे.

खासदार बळवंत वानखडे यांनाही आपण दिवाळी निमित्त भेटवस्तू दिल्या, अनेक आमदार, माजी नगरसेवकांना पाठवल्या. पण, कुणीही अशा प्रकारची अहंकाराची भाषा वापरली नाही. यशोमती ठाकूर यांनी मी दिलेल्या भेटवस्तू स्वीकारायला हव्या होत्या.