अमरावती : नवनीत राणा यांचा फार थोड्या मतांनी पराभव झाला, हे अमरावती जिल्ह्याचे दुर्देव आहे. त्या निवडून आल्या असत्या, तर केंद्रात मंत्री राहिल्या असत्या. जिल्ह्यातून डॉ. पंजाबराव देशमुखांनतर दुसऱ्या केंद्रीय मंत्री म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली असती. या देशाच्या राजकारणामध्ये मोठी छाप त्यांनी सोडली असती. पण, दुर्भाग्याने जे झाले, ते सर्वांच्या डोळ्यासमोर आहे, अशा शब्दात आमदार रवी राणा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
क्रांती ज्योती ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष ॲड नदेश अंबाडकर यांच्या नेतृत्वात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी युवा स्वाभिमान पक्षात जाहीर प्रवेश केला, यावेळी आयोजित कार्यक्रमात रवी राणा बोलत होते.
रवी राणा म्हणाले, निवडणुकीच्या वेळी जाती-पातीचे राजकारण केले जात असते, त्यात अनेकांना बळी जातो. पण, ज्या ज्या लोकांनी एकत्र येऊन नवनीत राणा यांना पराभूत करण्याचे काम केले, त्यांना त्याच जिद्दीने धडा शिकवण्याचे काम अमरावती जिल्ह्यातील जनतेने केले. विरोधकांना कायमचे घरी बसवले. मी जनतेसाठी काम करणारा माणूस आहे. शेतकऱ्यांसाठी तेवढीच लढाई लढतो. सर्वसामान्य माणसासाठी लढतो आणि कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता जनतेला प्रामाणिकपणे कसा न्याय देता येईल, हे पाहतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माझ्या जवळचे आहेत. त्यांनाही माहीत आहे की , मी जनतेसाठी लढणारा माणूस आहे. जो शब्द दिला तो पाळणे हा माझा धर्म आहे. ज्यानी मला बोट दिले, त्याच्यासाठी पूर्ण हात देणारा मी माणूस आहे.
यावेळी ॲड नंदेश अंबाडकर यांनी सांगीतले की, दहा टक्के राजकारण व ९० टक्के समाजकारण करणाऱ्या आमदार रवी राणा यांच्यासारख्या नेत्यासोबत जुळणे हे आमचे भाग्य असून आमचा प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्ता युवा स्वाभिमान पार्टीसोबत खांदयाला खांदा लावून समाजाच्या हिताकरीता कार्य करणार आहे. रवी राणा यांनी सुध्दा ॲड नंदेश अंबाडकर यांचे कौतुक करत, गेल्या २० वर्षांपासून समाजासाठी झटणारे एक झुंझार व प्रामाणिक व्यक्तीमत्व असल्याचे स्पष्ट केले.
महेंद्र भातकुले, रामदास मसने, ओमप्रकाश अंबाडकर, प्रा.सुरेश यावले, राजा खवले, प्रभाकर वानखडे, दीपक मेहरे, चंद्रशेखर कविटकर, पंजाबराव फरकाडे, माधुरी भुयार, राजेश भुयार, ईश्वरी सावरकर, अनुप कविटकर, रवींद्र चौधरी, वंदना दहिकर, मनोहर इंगळे, मधुकर भुयार, निळकंठराव यावलकर, अशोक देवते, विनय चौधरी, डॉ. विश्वनाथ कविटकर, दिनेश खेरडे, प्रदीप कांडलकर आदी पदाधिकारी व सदस्यांनी प्रवेश घेतला.