महानुभाव पंथीयांच्या भावना दुखाविणाऱ्या मजकुरावरून आक्षेप
नागपूर : नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. वि. भि. कोलते यांनी संपादित केलेल्या ‘लीळाचरित्र’ या ग्रंथातील काही आक्षेपार्ह मजकुरामुळे महानुभाव पंथीयांसह हिंदू धर्मीयांच्याही भावना दुखावणार असल्याचे सांगत उच्च न्यायालयाने त्यावर बंदी घातली होती. ती बंदी कायम असतानाही आता पुन्हा डॉ. कोलते संपादित या ग्रंथाचे जसेच्या तसे अनुवादन शिक्रापूर, पुणे येथील कृष्णराज शास्त्री पंजाबी यांनी केले आहे, तर ऋषीराज शास्त्री वांबोरी यांनी ते प्रकाशित केले आहे. न्यायालयीन बंदी असतानाही या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आल्याने चाळीस वर्षांनंतर पुन्हा नवा वाद निर्माण झाला आहे.
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने १९७७-७८ दरम्यान महानुभावांच्या पोथ्या आणि लीळाचरित्राचे संपादन करून नवा ग्रंथ प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला होता. माजी कुलगुरू डॉ. वि. भि. कोलते हे महानुभाव पंथाचे अभ्यासक असल्याने राज्य शासनाने संपादनाची धुरा त्यांना सोपवली. डॉ. कोलते यांनी संपादित केलेल्या लीळाचरित्राचे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने १९७८ मध्ये प्रकाशन केले. दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन १९८२ला करण्यात आले. मात्र, डॉ. कोलतेंनी संपादित केलेल्या लीळाचरित्रामध्ये श्री चक्रधर स्वामींविषयी आक्षेपार्ह आणि चुकीची माहिती, स्त्रियांविषयी अश्लील मजकूर, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज यांच्याविषयीही चुकीच्या गोष्टींचा प्रचार केल्याचा आरोप करण्यात आला. यामुळे महानुभाव पंथीयांच्याच नव्हे तर हिंदू धर्मीयांच्याही भावना दुखावणाऱ्या डॉ. कोलते संपादित लीळाचरित्रावर बंदी आणावी, अशा मागणीची याचिका अमरावती दिवाणी न्यायालयात करण्यात आली. न्यायालयानेही या ग्रंथावर बंदी घातली. राज्य शासनानेही बंदी घातलेल्या सर्व प्रती जप्त केल्या. असे असतानाही कृष्णराज शास्त्री पंजाबी यांनी डॉ. कोलते संपादित लीळाचरित्र जसेच्या तसे मराठीत अनुवादित केले व त्याचे प्रकाशन आचार्य ऋषीराज शास्त्री वांबोरी यांनी केले. या पुस्तकाचा जाहीर प्रकाशन सोहळा ८ सप्टेंबर २०२१ ला राबसाहेब गं. म. ठवरे स्मृती प्रार्थना सभागृह महानुभाव श्रीपंचकृष्ण मंदिर हुडकेश्वर येथे पार पडला. विशेष म्हणजे, महानुभव सेवा संघ नागपूरचे अध्यक्ष डॉ. तु. वि. गेडाम यावेळी उपस्थित होते.
आपल्याच दैवताची विटंबना कशी करेन?
मी ग्रंथाच्या प्रस्तावनेतच उल्लेख केल्याप्रमाणे, माझ्याकडे असलेले प्राचीन हस्तलिखित पोथ्या आणि मुद्रित ग्रंथाचा आधार घेऊन हे अनुवादन केले आहे. मी स्वत: महानुभाव पंथाचा अनुयायी असल्याने आपल्याच दैवताची विटंबना कशी करू शकतो, असा सवाल विवादित लीळाचरित्राचे अनुवाद कृष्णराज शास्त्री पंजाबी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केला. आमच्या पूर्वजांच्या हस्तलिखित ग्रंथात या लीळा आहेत. यातील ज्या बाबींना आक्षेपार्ह किं वा अश्लील म्हटले जात आहे त्या कृतींना स्वामींच्या तत्त्वज्ञानाचा आधार आहे. अनुवादित ग्रंथाला विरोध करणाऱ्यांनी न्यायालयात अवमान याचिका दाखल करावी, आम्ही त्याला उत्तर देऊ, असेही कृष्णराज शास्त्री पंजाबी यांनी सांगितले.
कृष्णराज शास्त्री पंजाबी अनुवादित ग्रंथावरून वाद घालण्याचे काहीही कारण नाही. जर काही आक्षेपार्ह बाबी त्यात असल्यास त्या वगळाव्या.
– डॉ. तु. वि. गेडाम, अध्यक्ष, महानुभव सेवा संघ नागपूर.
आक्षेप काय?
उच्च न्यायालयाची बंदी असलेल्या डॉ. कोलते संपादित लीळाचरित्राचा मराठी अनुवाद करून कृष्णराज शास्त्री पंजाबी व आचार्य ऋषीराज शास्त्री यांनी हेतुपुरस्सर चूक केली आहे. हा उच्च न्यायालयाचा अवमान असून श्रीचक्रधर स्वामींची प्रतिमा मलीन करत स्त्री जातीचा अपमान करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रंथाचे अनुवादक, ग्रंथ प्रकाशन सोहळ्याचे आयोजक तसेच ग्रंथाचे मुद्रक, प्रकाशक यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय महानुभाव महामंडळाने केली आहे. (पूर्वार्ध)