लोकसत्‍ता टीम

अमरावती : भाजपच्‍या उमेदवार नवनीत राणा यांच्‍या विरोधात उघड भूमिका घेणाऱ्या प्रहार जनशक्‍ती पक्षाने अमरावती लोकसभा मतदार संघातून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे दिनेश बुब यांना उमेदवारी घोषित केली आहे. या निर्णयामुळे महायुती आणि सोबतच महाविकास आघाडीतही बंडखोरी झाल्‍याची विचित्र परिस्थिती उद्भवली आहे.

प्रहारचे आमदार राजकुमार पटेल यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिनेश बुब यांच्‍या उमेदवारीची घोषणा केली. राजकुमार पटेल म्‍हणाले, प्रहारच्‍या पदाधिकारी आणि कार्यकर्त्‍यांच्‍या दोन बैठका झाल्‍या. त्‍यात अमरावती मतदार संघातून प्रहारने निवडणूक लढली पाहिजे, अशी आग्रही भूमिका व्‍यक्‍त करण्‍यात आली. प्रहारचे जिल्‍ह्यात दोन आमदार आहेत. त्‍यामुळे महायुतीतर्फे प्रहारला अमरावतीची जागा मिळावी, अशी मागणी आम्‍ही केली होती, पण त्‍याकडे दुर्लक्ष करण्‍यात आले.

आणखी वाचा-शिवजयंतीला गालबोट, मिरवणुकीवर दगडफेक; नांदुऱ्यात अटकसत्र सुरू

अमरावतीत सक्षम उमेदवार देण्‍याचा निर्णय बच्‍चू कडू यांनी घेतला. त्‍यानंतर दिनेश बुब यांच्‍याशी संपर्क साधण्‍यात आला. त्‍यांनी होकार देताच त्‍यांना उमेदवारी देण्‍यात आली. आम्‍ही अद्याप महायुतीतून बाहेर पडलेलो नाही. आमची ही लढत मैत्रिपूर्ण असेल, पण परिस्थिती उद्भवली, तर महायुतीतून बाहेरही पडू. दिनेश बुब हे सर्वसमावेशक असे नेतृत्‍व आहे. अमरावतीतून निवडणूक लढण्‍यास दिनेश बुब हे इच्‍छुक होते. पण, शिवसेना उद्धव ठाकरे गटाने ही जागा सोडली. त्‍यामुळे दिनेश बुब यांचा नाईलाज झाला. आमची लढत ही विकासाच्‍या मुद्यावर आहे. आमचे कुणाशीही वैर नाही. आम्‍हाला उमेदवारीसाठी कुणाकडे हात पसरावे लागत नाही, असा टोला राजकुमार पटेल यांनी लगावला.

आणखी वाचा-पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ईडी व सीबीआय हे कार्यकर्ते; नाना पटोले म्हणतात, “त्यांच्या वॉशिंग मशीनमध्ये…”

दिनेश बुब म्‍हणाले, सर्वपक्षीय नेत्‍यांनी आपल्‍याकडे निवडणूक लढण्‍याचा आग्रह धरला. शिवसेना उद्धव ठाकरे गटातर्फे निवडणूक लढण्‍याची आपली तयारी होती. पण, शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी अमरावती जिल्‍ह्यात शिवसेनेची बांधणी नाही, असा अहवाल दिल्‍याने ही जागा कॉंग्रेससाठी सोडण्‍यात आली. ही निवडणूक आपण न लढल्‍यस सामान्‍य मतदार आम्‍हाला माफ करणार नाहीत, अशी भूमिकाा अनेक नेत्‍यांनी मांडली. त्‍यांच्‍या आग्रहाखातर आपण निवडणूक लढत आहोत. शिवसेनेतून मी बाहेर पडलेलो नाही. शिवसेना हा एक स्‍वभाव आहे. तो बदलत नसतो. पण, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आदेश आला, तर आपण पक्षसदस्‍यत्‍वाचा राजीनामा देऊ, असे दिनेश बुब म्‍हणाले. दिनेश बुब हे प्रहार जनशाक्‍ती पक्षातर्फे येत्‍या ३ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्‍याची माहिती यावेळी देण्‍यात आली.