नागपूर : भूमी अभिलेख नागपूर विभागांतर्गत गट क श्रेणीतील भूकरमापक संवर्गातील रिक्त असलेली ११० पदे खुल्या व मागासवर्गीय संवर्गातील सरळसेवेने भरण्यात येणार आहे. या पदासाठी २४ ऑक्टोबर २०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात येणार असल्याची माहिती भूमी अभिलेख विभागाचे उपसंचालक लालसिंग मिसाळ यांनी दिली आहे.

भूकरमापक हे पद एस-६ या वेतनश्रेणीत असून या पदासाठी मान्यताप्राप्त अभियांत्रिकी महाविद्यालयातील किंवा मान्यताप्राप्त संस्थेकडील स्थापत्य अभियांत्रिकी पदविका किंवा माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण केल्यानंतर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे दोन वर्षाचे सर्वेक्षक व्यवसायाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.

भूमी अभिलेख नागपूर प्रदेश यांच्या अधिपत्याखाली विविध कार्यालयातील भूकरमापक ही रिक्त पदे भरण्यासाठी सरळसेवेने विहित अर्हता धारण करत असलेल्या पात्र उमेदवारांकडून स्पर्धात्मक परिक्षेसाठी केवळ ऑनलाईन पद्धतीने विभागाच्या https://ibpsreg.ibps.in/gomsep२५/ व https://mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. या भर्तीसाठी १३ व १४ नोव्हेंबर २०२५ रोजी ऑनलाईन परिक्षा घेण्यात येणार आहे.

परिक्षेसाठी आर्हता, वयोमर्यादा, शुल्क, निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया आदी सविस्तर संकेतस्थळावरच उपलब्ध करून देण्यात आली आहे. ऑनलाईन शुल्क भरण्याच्या कालावधी २४ ऑक्टोंबर२०२५ पर्यंत आहे. या पदासाठी प्रस्तावित परिक्षा दिनांक १३ व १४ नोव्हेंबर २०२५ रोजी घेण्यात येणार आहे. नियोजनाच्या दृष्टीने परिक्षेच्या तारखेमध्ये बदल होवू शकतो, अशी माहिती भूमी अभिलेख विभागाचे उपसंचालक लालासिंग मिसाळ यांनी दिली.