नागपूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) १०९ औषध निरीक्षक पदांसाठीची बहुप्रतीक्षित भरती अखेर जाहीर केली आहे. २०२० पासून रखडलेली ही भरती प्रक्रिया आता मार्गी लागल्याने राज्यभरातील फार्मसी पदवीधरांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, यावेळी अनुभवाची अट रद्द करण्यात आली आहे, ज्यामुळे नवशिक्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी ठरली आहे.
तीन वर्षांच्या संघर्षानंतर यश
पूर्वीच्या भरती प्रक्रियेत ‘अनुभव’ ही अट बंधनकारक होती, जी फार्मसी पदवी घेताच सरकारी सेवेत येऊ इच्छिणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांसाठी मोठा अडथळा ठरत होती. मात्र, महाराष्ट्र फार्मसी फोरमने राज्यभरातील विद्यार्थ्यांसमवेत या अटीविरोधात तीन वर्षे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. शासन, मंत्रालय, आयोग यांच्याशी वेळोवेळी संवाद साधून, तांत्रिक मुद्द्यांसह कायदेशीर निवेदने सादर करत या अटीचा विरोध करण्यात आला.या प्रक्रियेत महाराष्ट्र फार्मसी फोरमचे संचालक आदित्य वगरे यांचे योगदान अत्यंत मोलाचे ठरले. त्यांनी यासंदर्भात खालीलप्रमाणे प्रतिक्रिया दिली –
“या भरतीसाठी आम्ही मागील तीन वर्षे सातत्याने लढा दिला. अनेक वेळा विद्यार्थ्यांमध्ये निराशा पसरली, पण आम्ही हार मानली नाही. अनुभवाची अट चुकीची असल्याचे आम्ही संबंधित यंत्रणांना तर्कसंगतपणे पटवून दिले. हजारो विद्यार्थ्यांच्या नोकरीच्या संधी अव्यवहार्य अटींमुळे बुडत होत्या. आम्ही मंत्रालयात तासंतास थांबलो, आयोगाकडे अनेक वेळा भेटी घेतल्या, माध्यमांमध्ये मुद्दा मांडला आणि विधानभवनातही प्रश्न उपस्थित केले. ही भरती केवळ जागांची संख्या नाही, ही हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्याची खात्री आहे. फार्मसी पदवीधारक विद्यार्थ्यांना आता सरळसेवेच्या माध्यमातून औषध निरीक्षक होण्याची संधी उपलब्ध झाली आहे – हीच खरी लोकशाही आणि विद्यार्थ्यांच्या संघर्षाची जीत आहे.” विद्यार्थ्यांच्या संघर्षाला मिळालेले न्यायरूप फलित आहे. – आदित्य वगरे, संचालक, महाराष्ट्र फार्मसी फोरम
औषध निरीक्षक पदाचे महत्व
औषध निरीक्षक ही भूमिका औषधांच्या गुणवत्ता नियंत्रण, वितरण, उत्पादन आणि विक्रीवर देखरेख करणारी अत्यंत संवेदनशील आणि जबाबदारीची आहे. या भरतीमुळे राज्याची औषध निरीक्षण व्यवस्था अधिक सक्षम, पारदर्शक व परिणामकारक होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येतो.
उमेदवारांमध्ये नवचैतन्य
ही महाराष्ट्रातील आतापर्यंतची सर्वात मोठी औषध निरीक्षक भरती असल्याने, राज्यभरात फार्मसी क्षेत्रातील विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे व सकारात्मकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.