सहा वर्षांत १०९ रुग्णांचा मृत्यू, २८ जण पळाले; २८ टक्के अधिकारी-कर्मचाऱ्यांची पदे रिक्त

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर शहरातील प्रादेशिक मनोरुग्णालयाची स्थिती अत्यंत वाईट आहे. रुग्णालयात अधिकारी-कर्मचाऱ्यांची २८ टक्के पदे रिक्त असून गेल्या ६ वर्षे ७ महिन्यात येथील २८ रुग्णांनी पलायन केले असून याच काळात १०९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर रुग्णालयात काही औषधांचा ठणठणाटही असल्याचे माहितीच्या अधिकारात सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी पुढे आणले आहे.

विदर्भातील हे एकमेव  प्रादेशिक मनोरुग्णालय आहे. मेयो-मेडिकलमध्ये मनोरुग्णांकडे फारसे लक्ष दिले जात नाही. दोन्हीकडे रुग्ण दाखल करण्याची स्वतंत्र सोयही नाही. यामुळेच सामान्य रुग्णांच्या वार्डात भरती करताना या रुग्णांना बांधून ठेवले जाते. मनोरुग्णालयाचे तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित नगरकर यांची मेयोला बदली झाली. त्यानंतर या पदावर कायम अधिकारी मिळाला नाही. डॉ. नगरकर यांच्याकडे प्रभारी वैद्यकीय अधीक्षकाचा पदभार असला तरी त्यावरही काहींकडून आक्षेप घेण्यात आला आहे. मनोरुग्णालयात किमान तीन महिन्यांचा औषध साठा ठेवण्याच्या सूचना सरकारला उच्चस्तरीय समितीच्या असल्या तरी त्यात सुधारणा नसल्याचे नातेवाईक सांगतात.

मनोरुग्णालयात ६० ते ७० टक्के रुग्ण विदर्भातील असतात. या असुविधेचा फटका त्यांनाच बसतो. माहितीच्या अधिकारानुसार १ एप्रिल २०१० ते ३१ ऑक्टोबर २०१६ दरम्यान प्रादेशिक मनोरुग्णालयातील आंतररुग्ण विभागात ४ हजार ६६४ रुग्ण दाखल झाले. येथील बाह्य़रुग्ण विभागात नवीन संवर्गातील १५ हजार ५११, तर जुन्या संवर्गातील २७ हजार ९४६ रुग्णांवर उपचार झाला. या काळात ३ हजार ४६८ रुग्ण बरे झाले असले तरी २८ रुग्ण पळून गेले, तर तब्बल १०९ रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णालयात या कालावधीत बरीच औषधे उपलब्धच नसल्याचेही पुढे आले. रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक, उपअधीक्षकांसह सगळ्याच संवर्गातील २८ टक्के पदे रिक्त असून आठ संवर्गातील एकही कर्मचारी उपलब्ध नाही. त्यामुळे मनोरुग्णांना चांगल्या सेवा कशा मिळणार, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Regional psychologists hospital in vidarbha
First published on: 11-12-2016 at 00:10 IST